‘आयकिया’ची ग्रॅंड एंट्री

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

हैदराबाद - जागतिक पातळीवर फर्निचर निर्मितीतील सर्वांत मोठी रिटेलर कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘आयकिया’ने आता भारतात पाऊल ठेवले असून, हैदराबादच्या बाहेरील भागामध्ये चार लाख चौरस फुटांचे एक भव्य शोरूम सुरू करण्यात आले आहे. या शोरूममध्ये स्वीडिश ब्रॅंडच्या साडेसात हजार वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. भारतीय बाजारपेठ काबीज करण्यासाठी आतापर्यंत या कंपनीने तब्बल दहा अब्ज रुपयांची गुंतवणूक केली आहे. ‘आयकिया’चे हे शोरूम तेरा एकरवर उभारण्यात आले असून, दर वर्षी साठ लाख लोक या शोरूमला भेट देतील, अशी आशा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

‘आयकिया’च्या हैदराबादेतील स्टोअरमधून एक हजारापेक्षाही अधिक वस्तू आणि खेळण्या या दोनशे रुपयांपेक्षाही कमी किमतीला विकण्यात येतील. युरोपातील  विस्तार थांबल्याने कंपनीने आशिया आणि दक्षिण अमेरिकेवर लक्ष केंद्रित केले आहे. भारतातील वाढता मध्यमवर्ग लक्षात घेऊन कंपनीने २०२५ पर्यंत बड्या शहरांमध्ये २५ स्टोअर सुरू करण्याचे नियोजन आखले आहे. 

नवे रोजगार
‘आयकिया’मुळे हैदराबादेत दोन हजार जणांना रोजगार मिळेल. २०२५ पर्यंत आमच्या कंपनीचा भारतातील स्टाफ हा पंधरा हजारांपेक्षाही अधिक असेल ,असे कंपनीच्या प्रवक्‍त्याने सांगितले. भारतातील स्टोअरमध्ये बहुसंख्येने महिलांनाच नियुक्त करण्यात येईल. ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून कंपनीचे व्यवस्थापन स्थानिक कारागिरांसोबतही संपर्क साधणार आहे.

पुण्यात गुंतवणूक शक्‍य
‘आयकिया’चे मुंबईतील स्टोअर पुढील वर्षी सुरू होणार असून, त्यानंतर बंगळूर आणि गुडगाव येथेही कंपनीचे आउटलेट उघडण्यात येईल. कोलकता, चेन्नई, पुणे आणि अहमदाबादेतही गुंतवणूक करण्याचा या कंपनीचा विचार आहे. भारतातील फर्निचर मार्केट हे नॉन ब्रॅंडेड असल्याने कंपनीला येथे त्यांची उत्पादने विकताना अन्य कंपन्यांशीही स्पर्धा करावी लागेल.

जागांची खरेदी
खरंतर ‘आयकिया’ने २००६ मध्येच भारतात येण्याचे नियोजन आखले होते, पण परकी गुंतवणुकीवरील कठोर निर्बंधांमुळे ते शक्‍य झाले नव्हते. त्या वेळी भारतात येताना कंपनीला स्थानिक उद्योगसमूहाशी करार करणे अनिवार्य होते.  नंतर या नियमात बदल करण्यात आला. या कंपनीने हैदराबाद, बंगळूर, मुंबई आणि दिल्लीजवळील गुडगाव येथे जागा खरेदी केल्या आहेत.

काय आहे आयकिया?
‘आयकिया’ ही मूळची स्वीडिश बहुराष्ट्रीय कंपनी आहे, ती फर्निचरच्या डिझायनिंग आणि निर्मितीबरोबरच त्यांची विक्रीही करते. घरगुती वापराच्या वस्तू आणि खेळण्यांच्या उत्पादनावर या कंपनीचे नियंत्रण आहे. २००८ मध्ये ही कंपनी फर्निचरच्या निर्मिती क्षेत्रातील सर्वांत मोठा रिटेल उद्योगसमूह बनली.

Web Title: India first Ikea store opens today in Hyderabad