टेस्ला'सह 324 कंपन्यांना भारताचे आमंत्रण 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

टेस्ला इन्कॉर्पोरेशन, ग्लॅक्‍सोस्मिथक्‍लाइन यांच्यासह सुमारे 324 कंपन्यांना देशात उत्पादन प्रकल्प सुरू करण्याचे आमंत्रण सरकारकडून देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. 

नवी दिल्ली : टेस्ला इन्कॉर्पोरेशन, ग्लॅक्‍सोस्मिथक्‍लाइन यांच्यासह सुमारे 324 कंपन्यांना देशात उत्पादन प्रकल्प सुरू करण्याचे आमंत्रण सरकारकडून देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

चीन आणि अमेरिकेदरम्यान सुरू असलेल्या व्यापारयुद्धाचा लाभ घेत भारतात नवे उत्पादन किंवा निर्मिती प्रकल्प कंपन्यांनी सुरू करावेत, यासाठी भारत प्रयत्नशील आहे. एका इंग्रजी संकेतस्थळावर या संदर्भात अहवालाची माहिती देण्यात आली आहे. सरकार या प्रकल्पांना आवश्‍यक जमिनीबरोबरच ऊर्जा, पाणी आणि इतर पायाभूत सुविधा पुरवणार आहे. केंद्र सरकारच्या औद्योगिक प्रोत्साहन, अंतर्गत व्यवहार आणि गुंतवणूक विभागाने यासाठी एक अहवाल तयार केला असल्याची माहिती समोर आली आहे. टेस्लासह एली लिली अँड कंपनी, दक्षिण कोरियाची हन्व्हा केमिकल कॉर्पोरेशन आणि तैवानची हन हाई प्रिसिजन इंडस्ट्री कॉर्पोरेशन यांचाही यात समावेश आहे. 

सत्ता स्थापनेचा तिढा कायम असताना महाराष्ट्रासाठी केंद्राकडून मोठा निर्णय

अमेरिका-चीन व्यापारयुद्धाचा लाभ व्हिएतनाम आणि मलेशियासारख्या देशांना मिळाला आहे. मात्र, जमीन संपादनाचे कडक कायदे आणि कामगार कायदे यामुळे गुंतवणूकदारांनी किंवा उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांनी भारताकडे पाठ फिरवली आहे. नव्या अहवालाद्वारे येणाऱ्या प्रस्तावानुसार लालफितीचा अडसर कमी करण्यात येणार असून, देशाची अर्थव्यवस्था 2025 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलरवर नेण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पावले उचलण्यात येणार आहेत. 

लॅंड बॅंक स्थापन करणार 
सरकार नवी "लॅंड बॅंक' तयार करणार असून, त्याद्वारे उद्योगांना लगेचच प्रकल्पांची उभारणी करता येईल. यासाठी क्‍लस्टर उभे करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर या प्रकल्पांना विविध सवलती देण्यात येणार आहेत. यात इलेक्‍ट्रिक आणि हायब्रिड वाहनांसाठीही खास सवलती दिल्या जाणार आहेत. सध्या हा प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवण्यात आला असून, लवकरच त्यावर निर्णय होणे अपेक्षित आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India plans incentives for 324 firms including Tesla