भारत बनणार जगातील सर्वांत मोठा आयातदार देश

वृत्तसंस्था
शनिवार, 11 जानेवारी 2020

खनिज तेलाची आयात वाढणार 

नवी दिल्ली: भारताची खनिज तेलाची मागणी झपाट्याने वाढत असून, चालू वर्षाच्या मध्यापर्यंत चीनला मागे टाकून भारत जगातील सर्वांत मोठा तेल आयातदार देश बनेल, असे आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेने (आयईए) म्हटले आहे. देशातील तेलशुद्धीकरण प्रकल्पांची क्षमता वाढल्याने ही मागणी वाढत असली तरी, मध्य पूर्वेतील देशांमधील राजकीय अस्थिरतेचा तसेच तेल पुरवठ्यावर मोठा परिणाम होईल, असा इशारा संस्थेने दिला आहे. 
भारताची खनिज तेलाची मागणी 2024 पर्यंत प्रतिदिन 60 लाख बॅरलवर पोचेल. ही मागणी 2017 मध्ये प्रतिदिन 44 लाख बॅरल होती. वाढत्या मागणीला फक्त तेलाची विक्री कारणीभूत नसून, देशाची तेलशुद्धीकरण क्षमताही वाढत आहे. याचवेळी देशांतर्गत तेल उत्पादन मात्र "जैसे थे' आहे. खनिज तेलासाठी भारताला मध्य पूर्वेतील देशांवर सर्वस्वी अवलंबून राहावे लागत आहे. तसेच, या देशांमध्ये उद्भवणारी भू-राजकीय अस्थिरता आणि खनिज तेलाच्या भावात होणारे चढउतार यांचा भारतावर मोठा परिणाम होणार आहे. सध्या देशाला लागणाऱ्या एकूण तेलापैकी तब्बल 80 टक्के तेल आयात केले जाते. त्यात मध्य पूर्वेतील देशांचा वाटा 65 टक्के आहे. सद्यःस्थितीत भारत, चीन आणि अमेरिकेनंतर खनिज तेलाचा तिसरा मोठा आयातदार देश आहे. 

तेलशुद्धीकरण चौथ्या स्थानी 
तेलशुद्धीकरणात भारत जगातील चौथ्या क्रमांकाचा देश आहे. भारतातून शुद्ध पेट्रोल आणि डिझेलची निर्यात केली जाते. सद्यःस्थितीत भारतात प्रतिदिवशी 50 बॅरल खनिज तेलाचे शुद्धीकरण केले जाते. ते 2025 पर्यंत 80 लाख बॅरलवर पोचेल. त्यामुळे तेलशुद्धीकरणासाठी भारत एक आकर्षक बाजारपेठ होणार आहे. परिणामी, सौदी अरॅमको, ब्रिटिश पेट्रोलियम, अबूधाबी नॅशनल ऑइल कंपनी आणि टोटल सारख्या जागतिक तेल कंपन्या भारतात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India set to become world's No.2 oil importer surpassing China by mid2020