किमान शिलकीच्या मर्यादेची पूर्वकल्पना ग्राहकांना द्या!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मार्च 2017

एटीएम वापरावर मर्यादा 
बॅंकेचे ग्राहक अन्य बॅंकांच्या एटीएममधून केवळ तीन वेळा पैसे काढू शकणार आहेत. त्यापुढे प्रत्येक वेळी त्यांना 20 रुपये आकारण्यात येतील. बॅंकेच्या एटीएममधूनही ग्राहकांना पाच वेळा नि:शुल्क पैसे काढता येणार असून, त्यापुढे प्रत्येक वेळी 10 रुपये आकारण्यात येणार आहेत.

पुणे : सर्वसामान्यांशी संबंधित असलेल्या बचत खात्यावरील किमान शिल्लक रक्कम ठेवण्याच्या मर्यादेत वाढ करण्याचा; तसेच दंडात्मक शुल्क आकारण्याचा स्टेट बॅंक ऑफ इंडियाने घेतलेला निर्णय नैतिकतेला धरून नाही. असा निर्णय घेताना रिझर्व्ह बॅंकेच्या नियमावलीचे पालनही झालेले नाही. त्यामुळे स्टेट बॅंकेने अशा निर्णयाची पूर्वकल्पना आपल्या सर्व ग्राहकांना दिली पाहिजे, अशी मागणी सजग नागरिक मंचाने केली आहे. 

स्टेट बॅंकेने बचत; तसेच चालू खात्यावर किमान शिल्लक रक्कम ठेवण्याच्या मर्यादेत वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, अशी मर्यादा न पाळल्यास दंडात्मक शुल्क आकारण्याचेही ठरविले आहे. त्याची अंमलबजावणी येत्या एक एप्रिल 2017 पासून होणार आहे. याशिवाय, बॅंकेने "एटीएम'बरोबरच आपल्या सर्व प्रकारच्या सेवांचे सुधारित दर जाहीर केले आहेत. मात्र, त्याची कल्पना ग्राहकांना कोणत्याही माध्यमातून अद्याप देण्यात आलेली नाही, याकडे मंचाने लक्ष वेधले आहे.

खात्यातील किमान शिल्लक रक्कम आणि दंडाबाबत रिझर्व्ह बॅंकेने 2014 मध्ये जारी केलेल्या नियमावलीचा संदर्भही यासाठी देण्यात आला आहे. 

देशातील सर्वांत मोठी बॅंक असलेल्या स्टेट बॅंकेने बचत खात्यात मासिक सरासरी शिल्लक ठेवण्यासंदर्भात स्थळनिहाय वर्गवारी केली आहे. त्यानुसार, मेट्रो शहरांमध्ये किमान शिल्लक रु. 5 हजार, शहरी भागात रु. 3 हजार, निमशहरी भागात रु. 2 हजार; तर ग्रामीण भागासाठी रु. 1 हजार अशी मर्यादा ठरविली आहे. अशी शिल्लक ठेवू न शकणाऱ्या खातेदारांना त्या-त्या वर्गवारीनुसार कमी-जास्त प्रमाणात दंडात्मक शुल्क आकारले जाणार आहे. किमान शिल्लक न ठेवणाऱ्यांना असे शुल्क आकारण्याची परवानगी रिझर्व्ह बॅंकेनेच दिल्याचे स्टेट बॅंकेने म्हटले आहे. 

मात्र, अशी शिल्लक नसलेल्या खातेदारांना कोणतेही दंडात्मक शुल्क लावण्याआधी, किमान शिल्लक ठेवण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली पाहिजे, असे रिझर्व्ह बॅंकेने आपल्या नियमावलीत म्हटले आहे व ते अनिवार्य आहे; पण याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करण्यात आले आहे, हे सजग नागरिक मंचाने निदर्शनास आणून दिले आहे. या संदर्भात स्टेट बॅंकेला मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात याव्यात आणि बॅंकेच्या प्रत्येक ग्राहकाला किमान शिलकीविषयीच्या नव्या नियमांची माहिती इंग्रजी, हिंदी व स्थानिक भाषेत कळविण्यात यावी, अशी विनंती रिझर्व्ह बॅंकेला करण्यात आली आहे. 

एटीएम वापरावर मर्यादा 
बॅंकेचे ग्राहक अन्य बॅंकांच्या एटीएममधून केवळ तीन वेळा पैसे काढू शकणार आहेत. त्यापुढे प्रत्येक वेळी त्यांना 20 रुपये आकारण्यात येतील. बॅंकेच्या एटीएममधूनही ग्राहकांना पाच वेळा नि:शुल्क पैसे काढता येणार असून, त्यापुढे प्रत्येक वेळी 10 रुपये आकारण्यात येणार आहेत.

Web Title: Indian banking Reserve Bank of India minimum balance Vivek Velankar