मल्ल्याच्या प्रत्यार्पणाची तयारी 

वृत्तसंस्था
बुधवार, 3 मे 2017

विजय मल्ल्या याला गेल्या महिन्यात लंडनमध्ये ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर सशर्त जामिनावर त्याची सुटका करण्यात आली होती. भारताच्या मागणीनुसार मल्ल्याला स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी अटक केली होती.

नवी दिल्ली - कर्जबुडव्या विजय मल्ल्याला देशामध्ये परत आणण्याची तयारी सरकारी यंत्रणांनी सुरू केली आहे. मल्ल्याच्या प्रत्यार्पणासंबंधी केंद्रीय अन्वेषण (सीबीआय) आणि सक्तवसुली संचालनालयाचे (ईडी) संयुक्त पथक लंडनमध्ये दाखल झाले आहे. यामध्ये "सीबीआय'चे उपसंचालक राकेश अस्थाना "ईडी'च्या अधिकाऱ्यांसह ब्रिटनला रवाना झाले. 

विजय मल्ल्या याला गेल्या महिन्यात लंडनमध्ये ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर सशर्त जामिनावर त्याची सुटका करण्यात आली होती. भारताच्या मागणीनुसार मल्ल्याला स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी अटक केली होती. दोन्ही देशांमध्ये मल्ल्याच्या प्रत्यार्पणासंबंधी करार झाला होता. विजय मल्ल्याला भारतात आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारसमोर मोठे आव्हान आहे. 

लंडनमधून मल्ल्याच्या प्रत्यार्पणासंबंधी भारताने कूटनीतीचाही वापर केला होता. आता हे प्रकरण तेथील स्थानिक न्यायालयात आहे. मल्ल्याच्या अटकेनंतर लंडनमधील न्यायालयात त्याच्या प्रत्यार्पणासंबंधीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. याच प्रकरणात भारतातून "सीबीआय' आणि "ईडी'चे संयुक्त पथक लंडनमध्ये दाखल झाले आहे. 
दरम्यान, मल्ल्या आपल्या प्रत्यार्पणाला आव्हान देऊ शकतो. प्रत्यार्पण म्हणजे मानवाधिकारांचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न असल्याचा दावा मल्ल्या करू शकतो, असे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

विजय मल्ल्याच्या प्रकरणावर येत्या 17 मे रोजी येथील न्यायालयात सुनावणी होणार आहे. न्यायाधीश दोन्ही पक्षकारांना पुरावे सादर करण्याचे आदेश देण्याची शक्‍यता आहे. त्यानंतर पुढील सुनावणीची तारीख निश्‍चित करण्याची शक्‍यता आहे. विजय मल्ल्यावर राष्ट्रीय बॅंकांचे नऊ हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवल्याचा आरोप आहे. कर्जाची परतफेड न केल्याने भारताने मल्ल्याला फरारी घोषित केले आहे. 

Web Title: Indian officials in London to push Vijay Mallya's extradition