नोव्हेंबरमध्ये महागाई दर 3.15 टक्क्यांवर

वृत्तसंस्था
बुधवार, 14 डिसेंबर 2016

सप्टेंबमधील चलनवाढ 3.8 टक्के
सप्टेंबरमधील घाऊक चलनवाढीचा सुधारित आकडेवारी सरकारने जाहीर केली आहे. ती 3.57 टक्‍क्‍यांवरून 3.8 टक्‍क्‍यांवर गेली आहे.

नवी दिल्ली : घाऊक चलनवाढीत नोव्हेंबरमध्ये सलग तिसऱ्या महिन्यात घसरण झाली असून, ती 3.15 टक्‍क्‍यांवर आली आहे. नोटाबंदीमुळे मागणी कमी होऊन भाज्या आणि स्वयंपाकाच्या वस्तूंचे भाव गडगडल्याने घाऊक चलनवाढ कमी झाली आहे.

घाऊक किंमत निर्देशांकाच्या आधारे घाऊक चलनवाढ मोजली जाते. ऑक्‍टोबरमध्ये ती 3.39 टक्के होती. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात ती उणे 2.04 टक्के होती. भाज्यांच्या भावात सलग तिसऱ्या महिन्यात मोठी घसरण झाली आहे. भाज्यांची चलनवाढ उणे 24.10 टक्के आहे. कांद्याला भावातील मोठी घसरण कारणीभूत ठरली आहे. कांद्याच्या चलनवाढ उणे 51.51 टक्‍क्‍यांवर आली आहे. डाळींच्या भावात 21.73 टक्के वाढ झाली आहे, अशी माहिती वाणिज्य मंत्रालयाने दिली आहे.

बटाट्याची सर्वाधिक 36.97 टक्के महागाई झाली असून, फळांची महागाई 2.45 टक्के आहे. एकंदरीत खाद्यपदार्थांची महागाई 1.54 टक्के झाली असून, ऑक्‍टोबर महिन्यात ती 4.34 टक्के होती. उत्पादित वस्तूंची महागाई 3.20 टक्‍क्‍यांवर गेली असून, ऑक्‍टोबरमध्ये ती 4,34 टक्के होती. साखर 31.76 तर पेट्रोलच्या भावात 5.54 टक्के वाढ झाली आहे.

सप्टेंबमधील चलनवाढ 3.8 टक्के
सप्टेंबरमधील घाऊक चलनवाढीचा सुधारित आकडेवारी सरकारने जाहीर केली आहे. ती 3.57 टक्‍क्‍यांवरून 3.8 टक्‍क्‍यांवर गेली आहे.

किरकोळ चलनवाढीत घसरण झाल्यानंतर आता घाऊक चलनवाढीतही घसरण झाली आहे. किरकोळ चलनवाढ नोव्हेंबरमध्ये 3.63 टक्के या दोन वर्षातील नीचांकी पातळीवर पोचली आहे. रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्या नेतृत्वाखालील पतधोरण समितीने या महिन्यातील पतधोरण आढावा बैठकीत व्याजदर "जैसे थे' ठेवण्याचा निर्णय घेतला. नोटाबंदीमुळे नाशवंत वस्तूंचे भाव कमी होऊन किरकोळ चलनवाढीत 0.10 ते 0.15 टक्के घसरण होईल, असे पतधोरण समितीने म्हटले होते. रिझर्व्ह बॅंकेने मार्च 2017 पर्यंत चलनवाढीचे उद्दिष्ट 5 टक्के निश्‍चित केले असून, देशांतर्गत एकूण उत्पन्नाचा (जीडीपी) अंदाज चालू आर्थिक वर्षासाठी 7.6 टक्‍क्‍यांवरुन कमी करुन 7.1 टक्‍क्‍यांवर आणला आहे.

Web Title: India's wholesale inflation falls to 3.15% in November