औद्योगिक उत्पादनाची दाणादाण; सप्टेंबरमध्ये उत्पादन दर गेला मायनसमध्ये

Recession
Recession

नवी दिल्ली - अर्थव्यवस्थेतील मंदीने औद्योगिक उत्पादनाला खीळ बसली असून सप्टेंबरमध्ये औद्योगिक निर्देशांक उणे 4.3 टक्‍क्‍यांपर्यंत घसरला आहे. गेल्या आठ वर्षांतील औद्योगिक उत्पादनाची नीचांकी पातळी असून यात ग्राहकोपयोगी वस्तू, खनिजे आणि ऊर्जा उत्पादन मोठी घसरण झाली. अर्थचक्र मंदीच्या कचाट्यात रुतले असून त्याच्या विकासदराला मोठा फटका बसणार आहे. 

सांख्यिकी विभागाने सोमवारी (ता.11) औद्योगिक उत्पादनाची आकडेवारी जाहीर केली. ज्यात सप्टेंबरमधील औद्योगिक उत्पादनाची आकडेवारी उणे 4.3 टक्‍क्‍यांपर्यंत खाली घसरली आहे. यापूर्वी एप्रिल 2012 मध्ये तो 0.7 टक्के होता. तर गेल्या वर्षी सप्टेंबर 2018 मध्ये औद्योगिक उत्पादन निर्देशांक 4.6 टक्के होता. सुधारित अंदाजानुसार ऑगस्टमध्ये तो उणे 1.4 टक्के घसरला. एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत तो जेमतेम 1.3 टक्‍के आहे. 
कारखाना उत्पादन क्षेत्राला मंदीची मोठी झळ बसली आहे. सप्टेंबरमध्ये कारखाना उत्पादन 3.9 टक्‍क्‍यांपर्यंत घसरले. ऊर्जा निर्मितीत 2.6 टक्‍क्‍यांची घट झाली. गेल्या वर्षी याच महिन्यात 8.2 टक्‍क्‍यांची वाढ झाली होती.

त्याशिवाय खनिज उत्पादनात 8.5 टक्‍क्‍याची घसरण झाली. भांडवली वस्तूंच्या उत्पादनात 20.7 टक्‍क्‍यांची घट नोंदवण्यात आली आहे. भांडवली वस्तू हे गुंतवणुकीचा ओघ दर्शवते, मात्र भांडवली वस्तूंमधील गुंतवणूक आटल्याने त्याचा फटका उत्पादनाला बसला आहे. ग्राहकोपयोगी वस्तूंच्या उत्पादनात 9.9 टक्के घसरण झाली. 

उत्पादन क्षेत्र गाळात 
एकूण देशांतर्गत उत्पादनात 77 टक्के वाटा असणाऱ्या कारखाना उत्पादनाला मोठी झळ बसली आहे. वाहन उद्योग, धातूची उत्पादने, फर्निचर यासारख्या उत्पादन क्षेत्रातील महत्वाच्या उद्योगांमध्ये सप्टेंबरमध्ये प्रचंड घट झाली. 23 पैकी 17 उद्योगांमधील उत्पादनात घसरण नोंदवण्यात आली. मोटार व्हेईकल, ट्रेलर, सेमी ट्रेलर यांचे उत्पादनात उणे 24.8 टक्के राहिले. फर्निचर उत्पादनात 23.6 टक्के घसरण आणि धातू उत्पादनात 22 टक्के घसरण झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com