"इन्फोसिस'चे "सीईओ' पुन्हा अडचणीत 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

कंपनीच्या कामकाजात गैरव्यवहार झाल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप 

बंगळूरु : इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सलील पारेख यांच्यासमोरील अडचणीत आणखी वाढ झाली आहे. इन्फोसिसच्या आणखी एका कर्मचाऱ्याने पारेख यांच्यावर कंपनीच्या कामकाजात गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने पारेख यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी या कर्मचाऱ्याने केली आहे. 

कंपनीच्या एका कर्मचाऱ्याने कंपनीचे अध्यक्ष आणि सहसंस्थापकांना पत्र लिहिले आहे. या पत्रात म्हटले आहे की, पारेख हे कंपनीत दाखल होऊन आठ वर्षे झाली आहेत. अद्यापही मुंबईहून काम करीत आहेत. कंपनीच्या नियमानुसार, कंपनीच्या मुख्यालयातून म्हणजेच बंगळूरुमधून त्यांनी काम करणे आवश्‍यक आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने त्यांना बंगळूरुमधून काम करण्यास का सांगितले नाही? 
या कर्मचाऱ्याने स्वतःचे नाव जाहीर केलेले नाही; मात्र कंपनीच्या वित्त विभागात काम करीत असल्याचे त्याने म्हटले आहे.

कर्मचाऱ्याने पत्रात पुढे लिहिले आहे, की मी कंपनीच्या वित्त विभागात काम करतो. प्रकरण खूपच गंभीर आणि संवेदनशील असल्याने मी माझे नाव जाहीर करू शकत नाही. त्याबद्दल मी माफी मागतो. तसेच, कंपनीचा कर्मचारी आणि समभागधारक या नात्याने ही बाब मला अध्यक्षांच्या लक्षात आणून देणे गरजेचे वाटते. 

याआधी कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या गटाने आर्थिक ताळेबंदात गैरव्यवहाराचा आरोप केला होता. पारेख यांनी गेल्या तिमाहीचा सादर केलेला ताळेबंद चुकीचा असून, त्यातील नफ्याची आकडेवारी खोटी दाखविल्याचा दावा या कर्मचाऱ्यांनी केला होता. 

प्रवासावर लाखांचा खर्च 

सलील पारेख यांना दोन महिन्यांची मुदत देऊनही ते बंगळूरुवरून कंपनीचे काम पाहत नाही. तसेच, ते दर महिन्यात दोनदा बंगळूरु कार्यालयात येतात. त्यांच्यासाठी दर महिन्यात चार वेळा विमानाचे "बिझनेस क्‍लास'चे तिकीट आणि घरापासून विमानतळ आणि विमानतळावरून बंगळूरुच्या कार्यालयात येण्यासाठी कंपनी लाखो रुपयांचा खर्च करते, असा आरोपदेखील करण्यात आला आहे. यावर अद्याप कंपनीने काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "Infosys CEO" in trouble again