जागतिक बाजारपेठेत अस्थिरता

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 नोव्हेंबर 2016

फेडरल रिझर्व्हकडून डिसेंबरमध्ये व्याजदरात वाढ होण्याची शक्‍यता कमी झाली आहे. 
- मार्क झॅंडी, मुख्य अर्थतज्ज्ञ, मूडीज्‌ ॲनालिटीक्‍स

ट्रम्प यांच्या विजयाने फेडरल रिझर्व्हच्या दरवाढीची शक्‍यता कमी

वॉशिंग्टन - अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प निवडून आल्याने अमेरिकी फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात वाढ होण्याची शक्‍यता धूसर झाली असून, जागतिक वित्तीय बाजारपेठेत अस्थिरतेचे ढग दाटले आहेत. 

ट्रम्प यांच्या विजयानंतर डॉलर आणि शेअर बाजारांमध्ये घसरण झाली. रोख्यांना तेजी आली असून, सोन्याचे भाव गगनाला भिडू लागले आहेत. यातूनच रिपब्लिकन पक्षाच्या धोरणाबाबत जागतिक पातळीवर असलेले अनिश्‍चिततेचे वातावरण दिसत आहे. वित्तीय बाजारपेठांमधील उलथापालथीला अमेरिकी मध्यवर्ती बॅंक असलेल्या फेडरल रिझर्व्हचे निर्णय याआधी कारणीभूत ठरले आहेत. गुंतवणूकदारांचा कल ‘जैसे थे’ धोरणाचा अंगीकार करणाऱ्या हिलरी क्‍लिंटन यांच्याकडे होता. याउलट ट्रम्प यांनी आंतरराष्ट्रीय व्यापार करार फाडून टाकण्यासह त्यावर पुन्हा चर्चा करण्याचे सूतोवाच केले होते. 

त्यांनी मोठ्या प्रमाणात करसवलतीचे आश्‍वासन दिले असून, यामुळे अमेरिकेच्या अर्थसंकल्पी तुटीत वाढ होण्याची शक्‍यता अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. 

फेडरल रिझर्व्हच्या अध्यक्षा जेनेट येलेन यांच्या भवितव्यावरही ट्रम्प यांच्या विजयाने प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे असलेले अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना मदत व्हावी, यासाठी येलेन व्याजदर कमी ठेवत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला होता. येलेन यांचा कार्यकाळ जानेवारी २०१८ मध्ये संपत असून, त्यांच्या जागी दुसरी व्यक्ती नेमण्याचेही सूतोवाच ट्रम्प यांनी केले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: instability in global markets