व्याजदरवाढ अटळ

वृत्तसंस्था
मंगळवार, 5 जून 2018

मुंबई - अन्नधान्ये, भाजीपाला, इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे महागाईचा आगडोंब उसळला असून, रिझर्व्ह बॅंकेवरील दबाव वाढला आहे. महागाईची चिंता लागून राहिलेल्या ‘आरबीआय’च्या पतधोरण समितीची द्वैमासिक बैठक आजपासून मुंबईत सुरू झाली. या बैठकीत महागाईच्या पार्श्‍वभूमीवर पतधोरणात रेपो दरवाढ अटळ असल्याचे बोलले जात आहे. रेपो दरवाढ झाल्यास कर्जे महागणार असून, मासिक हप्त्याचा जादा भार कर्जदाराला सोसावा लागेल.

यंदा प्रथमच पतधोरण समितीची बैठक तीन दिवस चालणार आहे. बुधवारी (ता. ६) पतधोरण जाहीर होईल. ज्यात किमान पाव टक्‍क्‍याने रेपोदर वाढण्याचा अंदाज आहे. गेल्या महिनाभरात बहुतांश बॅंकांनी ठेवी आणि कर्जदरात वाढ केली होती, त्यामुळे रिझर्व्ह बॅंकेने रेपोदर वाढवल्यास कर्जाचा दर आणखी वाढेल. महागाईचा चढता आलेख पाहता व्याजदरवाढीची शक्‍यता नाकारता येत नाही, असे मत ॲक्‍सिस बॅंकेचे मुख्य अर्थतज्ज्ञ सौगाता भट्टाचार्य यांनी व्यक्‍त केले आहे. ते म्हणाले, की या बैठकीत व्याजदरवाढीसंदर्भातील सदस्यांचा कौल निर्णायक ठरणार आहे.

एप्रिलमधील बैठकीत डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य आणि मायकल डी. पात्रा या दोन सदस्यांनी व्याजदरवाढीच्या बाजूने कौल दिला होता. चालू बैठकीत आणखी काही सदस्य व्याजदरवाढीच्या बाजूने कौल देण्याची दाट शक्‍यता आहे. त्यामुळे साडेचार वर्षांनंतर बॅंकेकडून दरवाढ केली जाईल, अशी शक्‍यता आहे.

गेल्या पतधोरणात ‘आरबीआय’ने महागाईवर चिंता व्यक्त केली होती. मार्च आणि एप्रिलमध्ये महागाई दर उच्चांकावर गेला होता. महागाई नियंत्रण आणि विकासाला चालना देण्यासाठी आरबीआय दरवाढीबाबत विचार करेल, असे भट्टाचार्य यांनी सांगितले. चालू वर्षात रिझर्व्ह बॅंक रेपोदरात अर्धा टक्‍क्‍याची वाढ करेल, असा अंदाज ‘कोटक इकॉनॉमिक रिसर्च’ या संस्थेने व्यक्त केला आहे. जून महिन्यात व्याजदर ‘जैसे थे’ ठेवले तर मात्र ऑगस्ट आणि ऑक्‍टोबर या दोन पतधोरणांमध्ये व्याजदरवाढ होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

दोन महिन्यांत महागाईचा आगडोंब
 एप्रिलमध्ये महागाई दर ४.५८ टक्के
 आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचा दर ८० डॉलरपर्यंत वाढला
 देशांतर्गत पेट्रोल-डिझेल उच्चांकी स्तरावर, पेट्रोल प्रतिलिटर ८५ रुपयांवर 
 अन्नधान्यांची किमान आधारभूत किंमत वाढवल्याने महागाईवर परिणाम
 भाजीपाला आणि घरगुती वापराच्या वस्तू महागल्या 
 मॉन्सूनच्या कामगिरीवर भिस्त

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: interest rate increase reserve bank of india