‘गुंतवणुकी’साठी सोने किती आकर्षक?

मकरंद विपट
सोमवार, 25 जून 2018

प्राचीन काळापासून जगात सगळीकडे लोकांना सोन्याचे खूप आकर्षण आहे. आपल्या भारतात तर याचे आकर्षण जरा जास्तच आहे. आपल्याकडे बरेच सण सोने खरेदी करूनच साजरे केले जातात. सोन्याचे दागिने हा भारतीय महिलांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. अर्थात, दागिन्यांसाठी सोने घेण्यात चुकीचेही काही नाही. पण, काही लोक सोने हे वळे किंवा बिस्किटाच्या रूपात ‘गुंतवणूक’ म्हणून घेतात. कारण त्यांना ही गुंतवणूक अतिशय सुरक्षित वाटते. तसे ते घ्यायला काही हरकत नाही; पण त्याचा अतिरेक टाळायला हवा, असे वाटते. कारण आपण ‘गुंतवणुकी’च्या मानसिकतेतून घेतलेले सोने आपल्या आर्थिक अडचणींच्या वेळेस किती वेळा मोडतो?

प्राचीन काळापासून जगात सगळीकडे लोकांना सोन्याचे खूप आकर्षण आहे. आपल्या भारतात तर याचे आकर्षण जरा जास्तच आहे. आपल्याकडे बरेच सण सोने खरेदी करूनच साजरे केले जातात. सोन्याचे दागिने हा भारतीय महिलांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. अर्थात, दागिन्यांसाठी सोने घेण्यात चुकीचेही काही नाही. पण, काही लोक सोने हे वळे किंवा बिस्किटाच्या रूपात ‘गुंतवणूक’ म्हणून घेतात. कारण त्यांना ही गुंतवणूक अतिशय सुरक्षित वाटते. तसे ते घ्यायला काही हरकत नाही; पण त्याचा अतिरेक टाळायला हवा, असे वाटते. कारण आपण ‘गुंतवणुकी’च्या मानसिकतेतून घेतलेले सोने आपल्या आर्थिक अडचणींच्या वेळेस किती वेळा मोडतो? तर फार कमी वेळा किंवा शक्‍यतो नाहीच! दागिन्यांच्या रूपात घेतलेले सोने तर आपण कधीच मोडत नाही. कारण आपण त्यात भावनिक अडकलेलो असतो. शिवाय दागिने करताना आलेला घडणावळीचा खर्च आणि घट वजा केल्यास बरेच पैसे कमी मिळतात. त्याचबरोबर ‘गुंतवणूक’रूपी सोने सांभाळायची जोखीम असतेच. यासाठी बॅंकेतील लॉकर घेतल्यास त्याचे भाडे द्यावे लागते, ते वेगळेच! 

गेल्या ३८ वर्षांत सोन्याचा भाव दहा ग्रॅमला १३०० रुपयांवरून जवळजवळ ३२,००० रुपये झाला. पण, ‘गुंतवणूक’ म्हणून खरोखरंच सोन्याने महागाईदरावर (इन्फ्लेशन रेट) मात करून परतावा दिला आहे का? माझ्या मते नाही. कारण आपण जर गेल्या ३८ वर्षांतील सोन्याच्या भावातील वाढ पाहिली, तर सरासरी परतावा हा फक्त ८.८० टक्के आहे. मग ३८ वर्षांपूर्वी बॅंकेत ‘एफडी’ जरी केली असती, तरी त्यातून एवढाच परतावा मिळाला असता. एवढा मोठा कालावधी बघण्यापेक्षा आपण गेल्या पाच वर्षांतील सोन्याचा परतावा पाहिला तर चित्र काय दिसते, ते सोबतच्या तक्‍त्यातून पाहूया.

सोबतच्या तक्‍त्यावरून स्पष्ट होत आहे, की गेल्या पाच वर्षांत सोन्याने किती परतावा दिला आहे ते. मग सोने हा ‘गुंतवणुकी’साठीचा चांगला पर्याय आहे की नाही, हे लक्षात आले असेलच. याच कालावधीत म्हणजे गेल्या पाच वर्षांत म्युच्युअल फंडातील काही योजनांनी किती परतावा दिला, ते दुसऱ्या 
तक्‍त्यात पाहूया.  

माझ्या मते, जी गुंतवणूक महागाईदरावर मात करून परतावा देते ती खरी गुंतवणूक! आता आणि येणाऱ्या काही वर्षांत म्युच्युअल फंडातील गुंतवणूक हीच आपल्यासाठी ‘सोनेरी गुंतवणूक’ ठरण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे वाचकहो, निव्वळ आकर्षणापोटी सोन्याच्या धातूत ‘गुंतवणूक’ करायची, की खऱ्या अर्थाने परताना देणारी ‘सोनेरी गुंतवणूक’ करायची, याचा विचार करा आणि निर्णय घ्या!

Web Title: Investment Gold