‘सब-प्राइम’ संकटाचा धडा

अतुल सुळे
रविवार, 16 सप्टेंबर 2018

बरोबर दहा वर्षांपूर्वी अमेरिकेतील ‘सब-प्राइम’च्या संकटाने शेअर बाजारात भूकंप घडविला होता. त्यातून सावरत सावरत बाजार आज नव्या उच्चांकावर पोचला आहे. यानिमित्ताने २००८ ते २०१८ या दशकातील शेअर बाजाराच्या चढ-उतारांपासून गुंतवणूकदारांनी काय धडा घेतला पाहिजे, यावर टाकलेला एक दृष्टिक्षेप.

बरोबर दहा वर्षांपूर्वी अमेरिकेतील ‘सब-प्राइम’च्या संकटाने शेअर बाजारात भूकंप घडविला होता. त्यातून सावरत सावरत बाजार आज नव्या उच्चांकावर पोचला आहे. यानिमित्ताने २००८ ते २०१८ या दशकातील शेअर बाजाराच्या चढ-उतारांपासून गुंतवणूकदारांनी काय धडा घेतला पाहिजे, यावर टाकलेला एक दृष्टिक्षेप.

सन २००७ च्या अखेरीस मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (सेन्सेक्‍स) दर आठवड्याला नवनवे उच्चांक प्रस्थापित करीत जानेवारी २००८ मध्ये २१,००० अंशांच्या पलीकडे गेला होता. परंतु नंतर त्याच वर्षी अमेरिकेतील ‘सब-प्राइम’च्या जागतिक आर्थिक संकटाची चाहूल लागताच, तो १०,००० अंशांच्या आत आला होता. ज्यांनी शेअर बाजारात नुकताच किंवा अलीकडेच प्रवेश केला असेल, त्यांना ‘सब प्राइम’ ही काय भानगड आहे, ते समजून घेणे आवश्‍यक आहे. 

काय होती नक्की भानगड?
अमेरिकेत कर्ज घेणाऱ्यांचे दोन प्रकारे वर्गीकरण करण्यात येते. प्राइम बॉरोअर्स व सब-प्राइम बॉरोअर्स! ज्या कर्जदारांकडे चांगली, सुरक्षित नोकरी अथवा व्यवसाय आहे व कर्ज परतफेडीचे रेकॉर्ड चांगले आहे, मार्जिक भरण्यासाठी पैसा आहे, अशा कर्जदारांना ‘प्राइम बॉरोअर्स’ म्हणतात, तर ज्यांच्याकडे हे नाही, त्यांना ‘सब-प्राइम बॉरोअर्स’ म्हणतात. आपला व्यवसाय वाढविण्यासाठी अमेरिकेतील मोठमोठ्या बॅंका व वित्तीय संस्थांनी सब-प्राइम कर्जदारांना खूप मोठ्या प्रमाणावर कर्जवाटप केले होते व हे कर्ज देताना त्यांनी गृहीत धरले होते, की भविष्यकाळात घरांच्या किमती वाढतच जाणार आणि सब-प्राइम कर्जदारांनी कर्जाची परतफेड न केल्यास आपण त्यांची घरे विकून आपले कर्ज व्याजासह वसूल करून घेऊ शकू. परंतु, नंतर घरांच्या किमती कोसळल्याने वित्तीय संस्थांचे नेमके हेच गृहीतक चुकीचे ठरले व त्यामुळे तेथील मोठमोठ्या बॅंका अडचणीत आल्या. १५८ वर्षे जुनी वित्तीय संस्था असलेली लेहमन ब्रदर्स एवढी अडचणीत आली, की त्यांना १५ सप्टेंबर २००८ रोजी दिवाळखोरीचा अर्ज करावा लागला. अमेरिकेतील या आर्थिक संकटाचा फटका जगातील सर्व प्रमुख देशांना बसला व जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या गर्तेत ढकलली गेली. अनेकांची घरे गेली, नोकऱ्या गेल्या, व्यवसाय बंद पडले व गुंतवणूकदारांचे प्रचंड नुकसान झाले. या बिकट परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी जगभरातील प्रमुख मध्यवर्ती बॅंकांनी व्याजाचे दर खूपच कमी करून अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा प्रयत्न केला, ज्याला ‘क्वांटिटेटिव्ह इझिंग’ (क्‍यूई) असे म्हणण्यात येते.

‘सेन्सेक्‍स’चा असाही प्रवास!
आपल्या ‘सेन्सेक्‍स’बद्दल बोलायचे झाल्यास, या निर्देशांकाने पुढील २-३ वर्षांत पुन्हा एकदा २००८ ची उच्चांकी पातळी गाठली. एवढेच नव्हे, तर २००८ च्या नीचांकी पातळीपासून सध्या तो चौपटीहून अधिक झाला आहे! आता पुढील वर्षभरात हा ‘सेन्सेक्‍स’ ३८,००० अंशांवरून ४२,००० अंशांवर गेलेला असेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. (अर्थात कच्चे तेल, रुपया, निवडणुका यासारख्या घटनांमुळे त्यात चढ-उतार दिसणार, हे साहजिक आहे.) 

यानिमित्ताने २००८ ते २०१८ या दशकातील शेअर बाजाराच्या चढ-उतारांपासून गुंतवणूकदारांना काही महत्त्वाचे धडे मिळतात, ते पुढीलप्रमाणे - 
    आपले पैसे कोणत्याही एकाच प्रकारात न गुंतवता ते वेगवेगळ्या ॲसेट क्‍लासमध्ये विभागून ठेवावेत.
    एखाद्या ॲसेटच्या किमती खूप वधारल्यास वेळोवेळी ‘प्रॉफिट बुकिंग’ करून आलेला पैसा वेगळ्या ॲसेटमध्ये गुंतवावा. 
    महागाईवर मात करण्यासाठी थेट शेअर्समध्ये अथवा शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंडात दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणे गरजेचे असते. 
    शेअर्समधून मिळणारा परतावा एकसारखा नसतो व चांगला परतावा मिळविण्यासाठी मूलभूतदृष्ट्या भक्कम कंपन्या वा योजनांमध्ये गुंतवणूक 
करावी लागते. गुंतवणूकगुरू वॉरन बफे सांगतात, ‘थिंक इन टर्म्‌स ऑफ डिकेड, अँड नॉट इयर्स!’
    आपल्या पोर्टफोलिओचे मूल्य अर्धे झालेले बघण्याची हिंमत नसल्यास 
शेअर बाजारात गुंतवणूक करू नये.
    शेअर बाजारातील मोठी पडझड ही उत्तम कंपन्यांचे शेअर पडलेल्या भावाने खरेदी करण्याची चांगली संधी असते. २००८ मध्ये खरेदी केलेल्या काही चांगल्या कंपन्यांचे भाव १०० पासून ५०० पट झाले आहेत. 
उदा. ‘सिंफनी’चा शेअर २ रुपयांवरून रु. १००० पर्यंत पोचला. 
    शेअर बाजारात प्रत्यक्ष गुंतवणूक करण्याची सवड, आवड व कौशल्य नसल्यास म्युच्युअल फंडात ‘एसआयपी’द्वारे गुंतवणूक करावी. गेल्या १० वर्षांत अनेक चांगल्या मिड-कॅप, स्मॉल-कॅप योजनांनी २० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक वार्षिक चक्रवाढ परतावा मिळवून दिला आहे. म्हणजेच दरमहा रु. ५००० च्या ‘एसआयपी’चे रु. १७ लाखांपेक्षा अधिक मूल्य झाले आहे! 
वरील धडे व्यवस्थितरीत्या गिरवल्यास सर्वसामान्य गुंतवणूकदारांना 
‘सब-प्राइम’सारख्या ‘ब्लॅक स्वान’ (क्वचित कधीतरी घडणाऱ्या) घटनेला 
घाबरण्याचे कारण नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Investment Share Market Sensex Sub Prime