इराणकडून तेल खरेदी थांबविणार

पीटीआय
बुधवार, 24 एप्रिल 2019

भारतातील रिफायनरींना पुरेशा प्रमाणात खनिज तेलाचा पुरवठा करण्यासाठीची ठोस योजना तयार असून पेट्रोल, डिझेल व अन्य पेट्रोलियम उत्पादनांना असलेल्या मागणीच्या पूर्ततेसाठी या रिफायनरी सज्ज आहेत. भारत इतर तेल उत्पादक देशांकडून अतिरिक्त खनिज तेल आयात करून आपली गरज भागवेल. 
- धर्मेंद्र प्रधान, पेट्रोलियममंत्री

नवी दिल्ली - अमेरिकेने इराणवर घातलेल्या निर्बंधांच्या पार्श्‍वभूमीवर भारत या देशाकडून होणारी खनिज तेलाची आयात पूर्णपणे थांबविणार असल्याची माहिती आज सूत्रांनी दिली.

इराणकडून खनिज तेल खरेदी करण्यासाठी भारतासह आठ देशांना दिलेली सवलत वाढविणार नसल्याचे अमेरिकेने काल (ता. २२) स्पष्ट केले. यामुळे निर्माण होणारी उणीव भरून काढण्यासाठी सौदी अरेबिया व इतर देशांकडून अतिरिक्त खनिज तेलाची आयात केली जाणार असून, इराणवरील निर्बंध मागे घेईपर्यंत भारत या देशाकडून होणारी तेलाची आयात पूर्णपणे थांबवेल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

तत्पूर्वी, भारत व अमेरिकेदरम्यान यासंदर्भात महिन्याच्या अखेरीस बैठक होणार असून, त्यात इराणकडून होणारी तेल खरेदी २ मेनंतरही कायम राहावी, असा भारताचा प्रयत्न असेल, अशी माहितीही या अधिकाऱ्याने दिली.

दरम्यान, चीनने अमेरिकेच्या या निर्णयाला ठामपणे विरोध दर्शवला आहे. अमेरिकेचा हा निर्णय एकतर्फी असून, यामुळे मध्य आशियासह आंतरराष्ट्रीय ऊर्जा बाजारात अस्थिरता निर्माण होईल, अशी प्रतिक्रिया चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी व्यक्त केली.

अमेरिका हा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राजनैतिक अपयश दर्शवतो. देशांतर्गत इंधनाची मागणी व सुरक्षा याबाबत त्यांनी मौन बाळगले आहे. इंधनाचे दर ५ ते १० रुपयांनी वाढवण्याची तयारी सुरू असून, निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर २३ मेपर्यंत इंधन दरात वाढ न करण्याच्या सूचना त्यांनी कंपन्यांना दिल्या आहेत.
- रणदीप सुरजेवाला, काँग्रेस प्रवक्ते

Web Title: Iran Oil Purchasing Stop by India