उद्योग जगताचे 'चॅम्पियन' योगी देवेश्वर काळाच्या पडद्याआड 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 मे 2019

उद्योग जगत आणि मालकी हक्क म्हणजे 'हॅन्ड इन हॅन्ड' जाणारी गोष्ट. एकीकडे छोटमोठ्या कंपनीची मालकी मिळावी म्हणून उद्योग जगतातील कुटुंबात होणारे वाद आपण पहिले आहेत.

मुंबई : उद्योग जगत आणि मालकी हक्क म्हणजे 'हॅन्ड इन हॅन्ड' जाणारी गोष्ट. एकीकडे छोटमोठ्या कंपनीची मालकी मिळावी म्हणून उद्योग जगतातील कुटुंबात होणारे वाद आपण पहिले आहेत. दुसरीकडे, हिस्सेदारीच्या माध्यमातून चांगली कंपनी विकत घेण्याचा प्रतिस्पर्धी कंपनीचा प्रयत्न असतो. मात्र, कॉर्पोरेट क्षेत्रात संस्थात्मक भागीदारीच्या माध्यमातून उत्तुंग यश मिळविणाऱ्या कंपन्या दुर्मिळच. 'आयटीसी' ही त्यातलीच एक. या यशाचे सारे श्रेय जाते योगेश चंदर देवेश्वर उर्फ योगी देवेश्वर यांना. 

1968 साली कंपनीच्या व्यवस्थापनासमोर न झुकता हवे ते पद/ हुद्दा मिळवून करिअरला सुरुवात करणे सोपे नव्हते. ते ही कुठलीही पार्श्वभूमी नसताना. स्वतःवरचा आत्मविश्वास आणि आयआयटी दिल्ली येथून अभियांत्रिकीची पदवी मिळवून प्रिंटिंग टेक्नॉलॉजी विभागात कामाला सुरुवात करून फक्त कंपनीतीलच नव्हे तर देशातील सर्वात जास्त वेळ अध्यक्ष आणि सीईओ पदावर राहण्याचा मान देवेश्वर यांना जातो. 

1980च्या दशकापूर्वी, ‘इंडियन टोबॅको’ किंवा ‘विल्स’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या कंपनीला एफएमसीजी क्षेत्रातील आघाडीची कंपनी बनविण्याचे श्रेय देवेश्वर यांना जाते. आयटीसीमधील मधील भागीदार ब्रिटिश अमेरिकी कंपनीने जेंव्हा कंपनीवरच मालकी मिळविण्याचा प्रयत्न केला तेंव्हा बलाढ्य विदेशी कंपनीला कायदेशीररित्या हरवून आयटीसीचे स्वामित्व टिकविण्यात देवेश्वर यांचा मोठा वाटा होता. 

व्यवसायातील डायव्हर्सिफिकेशन आयटीसीसाठी अशक्यप्राय मानली जाणारी गोष्ट. मात्र, शैक्षणिक दृष्ट्या अभियंता असलेल्या देवेश्वर यांनी ‘आयटीसी वेलकम’ नावाचा हॉटेल ब्रँड, पेपर आणि पॅकेजिंग उद्योग आणि नंतर शालेय वस्तू, स्टेशनरी, वह्य़ा, बिस्किट्स, उदबत्ती, काडेपेटी, साबण, शाम्पू, तयार कपडे, पर्फ्यूम अशा एक ना अनेक व्यवसायांत कंपनीचे बस्तान बसवून पहिल्या क्रमांकावर आणले. पूर्वी केवळ एक सिगारेट कंपनी म्हणून ओळखली जाणारी आयटीसी आता एक बलाढय़ एफएमसीजी कंपनी म्हणून ओळखली जाते. 

भारतीय उद्योगजगताच्या दृष्टिकोनातून कॉर्पोरेट गव्हर्नन्स हा नवखा शब्द. मात्र देवेश्वर यांनी 1990 सालापासूनच त्याचा आग्रह धरून प्रत्यक्षात त्या मार्गावर कंपनीला मार्गस्थ केले. कंपनीचा शेअरहोल्डिंग पॅटर्न पहिला तर त्यात प्रवर्तकांचा कुठलाही हिस्सा नाही असे तुम्हाला दिसून येईल. खऱ्या अर्थाने व्यावसायिक व्यवस्थापन असलेल्या आयटीसीला जगातील बलाढय़ कंपनी बनविण्यासाठी त्यांनी आयुष्य खर्ची केले. चांगले व्यवस्थापन आणि व्यावसायिकतेच्या जोरावर आयटीसीला 'नॅशनल चॅम्पियन' बनवायचे आहे असे ते वेगवेगळ्या व्यासपीठावर सांगायचे. ते त्यांनी करून दाखविले. त्यांची दूरदृष्टी आणि हुशारी इतकी की एअर इंडियाचे नेतृत्व करावे म्हणून तत्कालीन विमान वाहतूक मंत्री माधवराव सिंधिया यांनी त्यांना अक्षरक्षा गळ घातली होती. त्यांनी देखील त्यांच्या शब्दाचा मान ठेवत काही काळ एअर इंडियाचे यशस्वी नेतृत्व केले. 

आज त्यांनी वयाच्या 72व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. कॉर्पोरेट गव्हर्नन्समुळे देशातील मोठमोठ्या कंपन्या कोसळत असताना किमान इतर कंपन्यांनी आपल्या व्यवस्थापनात गव्हर्नन्स आणून त्यांच्या भाषेत सांगायचे तर 'राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय चॅम्पियन' होणे हीच त्यांच्यासाठी श्रद्धांजली असेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ITC chairman YC Deveshwar passes away