जन-धन खात्यातील ठेवींचे प्रमाण 87 हजार कोटींवर

वृत्तसंस्था
रविवार, 1 जानेवारी 2017

याशिवाय, जन धन खात्यांमध्ये 30,000 ते 50,000 रकमेच्या लहान ठेवींचा आकडा 2,000 कोटी रुपयांवर पोचल्याची माहिती प्राप्तिकर विभागाला उपलब्ध झाली आहे.

नवी दिल्ली - केंद्राने नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर पुढील 45 दिवसांमध्ये जन-धन खात्यांमध्ये तब्बल 87,000 कोटी रुपयांच्या ठेवी जमा झाल्या आहेत. या खात्यांमधील ठेवींचे प्रमाण अचानक दुपटीने वाढल्यामुळे प्राप्तिकर विभागाने अधिक काळजीपुर्वक चौकशी करण्यास सुरुवात केली आहे.

याशिवाय, जन धन खात्यांमध्ये 30,000 ते 50,000 रकमेच्या लहान ठेवींचा आकडा 2,000 कोटी रुपयांवर पोचल्याची माहिती प्राप्तिकर विभागाला उपलब्ध झाली आहे.

"जन धन खात्यांविषयी मिळालेल्या सर्व माहितीची व्यवस्थित चौकशी केली जाणार आहे. या खातेधारकांच्या नावावर इतर कोणी आपला पैसा जमा केल्याचे आढळून आल्यास योग्य ती कारवाई केली जाईल", असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

नोटाबंदी जाहीर झाल्यानंतर पहिल्या आठवड्यात जन धन खात्यांमध्ये तब्बल 20,224 कोटी रुपयांचा ओघ दाखल झाला. परंतु त्यानंतर ठेवींचे प्रमाण हळुहळु कमी झाले. पहिल्या दोन आठवड्यांमध्ये दर आठवड्याला 5000 कोटी रुपयांच्या ठेवी दाखल झाल्या. त्यानंतर हे प्रमाण आठवड्याला 1,000 कोटी रुपयांवर आले, असेही त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 8 नोव्हेंबर रोजी देशांतर्गत आर्थिक व्यवहारातून पाचशे व हजारांच्या नोटा बाद झाल्याची घोषणा केली. त्यानंतर 9 नोव्हेंबर रोजी जन धन खात्यांमध्ये 45,637 कोटी रुपयांच्या ठेवी जमा झाल्या. यानंतर 10 ते 23 डिसेंबरदरम्यान 48 लाख जन धन खात्यांमधील ठेवींचे प्रमाण 41,523 कोटी रुपयांवर पोचले. अशाप्रकारे, 23 डिसेंबरपर्यंत जन धन खात्यांमधील ठेवींचे प्रमाण 87,100 कोटी रुपयांवर पोचले होते.

Web Title: Jan Dhan Deposits Double To Rs. 87,000 Crore, Tax Officials Dissect Data