esakal | ‘जेट’ला मिळणार संजीवनी
sakal

बोलून बातमी शोधा

Jet-Airways

‘जेट’ला मिळणार संजीवनी

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - आर्थिक संकटाच्या गर्तेत हेलकावे घेणाऱ्या ‘जेट एअरवेज’ला सावरण्यासाठी बॅंकांनी पुन्हा एकदा कर्ज देण्याची तयारी दर्शविली आहे. ‘जेट एअरवेज’चे प्रमुख नरेश गोयल यांनी हिस्सा कमी करावा तसेच कंपनी व्यवस्थापनात बदल झाल्यास नव्याने अर्थसाह्य करण्यास तयार असल्याचे बॅंकांच्या वतीने भारतीय स्टेट बॅंकेने म्हटले आहे. ‘जेट एअरवेज’ची सध्या एकतृतीयांश विमानांसह सेवा सुरू असून, वेतन थकल्याने शेकडो वैमानिकांनी इतर कंपन्यांमध्ये नोकरीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आर्थिक चणचण आणि वैमानिकांची धरणे, यामुळे कंपनीची सेवा प्रभावित झाली आहे.

‘जेट एअरवेज’मधील घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर ‘एसबीआय’चे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी नुकतीच अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली. या वेळी नागरी हवाई सचिव प्रदीपसिंग खरोला आणि पंतप्रधानांचे प्रधान सचिव निपेंद्र मिश्रा उपस्थित होते. प्रवाशांच्या दृष्टीने ‘जेट’ची सेवा सुरू राहणे आवश्‍यक आहे. त्यामुळे कंपनीला आर्थिक पॅकेज देण्यासंदर्भात चर्चा झाल्याचे कुमार यांनी सांगितले. नव्याने अर्थसाह्य केल्यानंतर कंपनीवर दिवाळखोरीची प्रक्रिया चालवणे हा शेवटचा पर्याय बॅंकांपुढे आहे. कंपनीला मदत करण्यासाठी गेल्या पाच महिन्यांपासून बॅंकांनी सर्व पर्यायांची पडताळणी केली आहे. ‘जेट’ला नव्याने कर्ज देण्याचा आराखडा तयार आहे. मात्र, यामध्ये वैयक्तिक साह्य केले जाणार नाही, असे कुमार यांनी स्षप्ट केले.

दरम्यान, बॅंक खात्यात खडखडात झाल्याने कंपनीकडून अनेकांची देणी थकली आहेत. परिणामी, बहुसंख्य विमाने जमिनीवर आहेत. ‘जेट’मधील कर्मचारी संघटनेने ३१ मार्चपूर्वी वेतन अदा न केल्यास १ एप्रिलपासून विमानसेवा बंद करण्याचा इशारा दिला आहे. ‘जेट’वर ८ हजार २०० कोटींचे कर्ज असून, वेतन अदा करण्यासाठी तातडीने १ हजार ७०० कोटींची आवश्‍यकता आहे.

‘जेट’मधील २३ हजार नोकऱ्या टांगणीला
गेल्या सहा महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन देण्यास ‘जेट एअरवेज’ सातत्याने अपयशी ठरत आहे. कंपनी कधीही बंद पडू शकते, अशी शक्‍यता जाणकारांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे २३ हजार नोकऱ्या संकटात आल्या आहेत. दरम्यान, कर्मचाऱ्यांनी नव्या नोकरीचा शोध सुरू केला असून, ‘स्पाइस जेट’ कंपनीकडे ‘जेट एअरवेज’च्या २६० वैमानिकांनी मुलाखत दिली आहे. यामध्ये १५० मुख्य वैमानिकांचा समावेश आहे; त्याशिवाय ‘इंडिगो’ने ‘जेट’मधील कर्मचाऱ्यांना चांगल्या ऑफर्स दिल्या आहेत.

‘जेट एअरवेज’ची क्रमवारीत घसरण
नागरी हवाई महासंचालकांच्या (डीजीसीए) आकडेवारीनुसार, देशातील आघाडीच्या विमान कंपन्यांच्या क्रमवारीत ‘जेट एअरवेज’ची चौथ्या स्थानी घसरण झाली आहे. ‘इंडिगो’ अव्वल स्थानी कायम आहे.

‘एतिहाद’कडून बाहेर पडण्याचे संकेत
‘जेट एअरवेज’मध्ये नरेश गोयल यांचा ५१ टक्के मालकी हिस्सा आहे. ‘एतिहाद एअरवेज’चा २४ टक्के हिस्सा आहे. मात्र, गोयल यांच्या नेतृत्वावरून दोन्ही कंपन्यांमध्ये वाद आहे. ‘जेट एअरवेज’वरील संकट गडद झाल्याने ‘एतिहाद एअरवेज’ने या भागीदारीतून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत. ‘एतिहाद’ने २४ टक्के हिस्सा खरेदी करण्याचा प्रस्ताव ‘एसबीआय’ला दिला आहे.

loading image