'या' कंपनीत होणार मोठी नोकर कपात; 7 हजार जणांच्या नोकरीवर पाणी

मंगळवार, 21 मे 2019

वॉशिंग्टन: अमेरिकेतील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी फोर्ड मोठी नोकर कपात करणार आहे. फोर्ड मोटर्स सात हजार कर्मचाऱ्यांना कमी करणार आहे.  फोर्डच्या जगभरातील एकूण मनुष्यबळाच्या 10 टक्के नोकर कपात करण्यात येणार असून बऱ्याचशा कर्माचाऱ्यांच्या कामाची पुनरर्चना देखील करण्यात येणार आहे. सर्व प्रक्रिया ऑगस्टअखेरपर्यत पूर्ण करण्याचे कंपनीचे नियोजन आहे, अशी माहिती फोर्डकडून देण्यात आली आहे. 

फोर्डने अमेरिकेतील सेडान श्रेणीतील कारचे उत्पादन कमी करत आणले आहे. कारण बहुतांश अमेरिकी नागरिक आता पिकअप ट्रक आणि स्पोर्ट्स युटिलिटी व्हेहिकलला पसंती देऊ लागले आहेत. मागील वर्षापासूनच फोर्डने यासंदर्भातील हालचालींना सुरूवात केली आहे. उत्तर अमेरिकेतील वेगवेगळ्या उत्पादन प्रकल्पांमधून फोर्डने याआधीच नोकरकपातीला सुरूवात केली आहे. या धोरणामुळे कंपनीची 60 कोटी डॉलरची बचत होणार आहे. त्याचबरोबर सध्या जरी पारंपारिक पद्धतीच्या वाहनांच्या विक्रीतूनच मोठा नफा होत असला तरी फोर्डने इलेक्ट्रीक वाहनांमध्ये आणि ऑटोनॉमस ड्राईव्हिंग तंत्रज्ञानात मोठी गुंतवणूक करण्यास सुरूवात केली आहे. भविष्यात या श्रेणीतील वाहनांची बाजारपेठ पाहता कंपनीने हे धोरण आखले आहे. 

एफ-150 पिकअप ट्रक हे सध्या सर्वाधिक खप होणारे वाहन आहे. 2018च्या अखेर फोर्डकडे 1,99,000 कर्मचाऱ्यांचा ताफा होता. तर त्याआधीच्या वर्षी फोर्डमधील एकूण कर्मचाऱ्यांची संख्या 2,02,000 इतकी होती. एप्रिल 2018 मध्ये फोर्डने नोकर कपातीचे संकेत दिले होते. मार्च महिन्यात फोर्डने जर्मनीतील प्रकल्पातून 5,000 कर्मचाऱ्यांची कपात केली होती. ब्राझिल आणि रशियासारख्या देशांमधील मोठ्या आकाराच्या व्यावसायिक ट्रकच्या व्यवसायातून बाहेर पडण्यासाठीही फोर्डने पाऊले उचलली होती.