अत्याधुनिक क्षेपणास्त्रांसाठी राफेलकडून 'कल्याणी'ला 680 कोटींचे कंत्राट

वृत्तसंस्था
गुरुवार, 11 जुलै 2019

- 680 कोटी रुपयांचे (10 कोटी डॉलर) कंत्राट मिळाले राफेलकडून. 

नवी दिल्ली : कल्याणी राफेल अॅडव्हान्स सिस्टिम्स लिमिटेड या कंपनीला (केआरएएस) अत्याधुनिक बराक आणि एमआरएसएएम क्षेपणास्त्रांचे उत्पादन करण्याचे जवळपास 680 कोटी रुपयांचे (10 कोटी डॉलर) कंत्राट राफेलकडून मिळाले आहे. भारतीय लष्कर आणि वायूदलासाठी अत्याधुनिक 1000 बराक आणि 8 एमआरएसएएम क्षेपणास्त्रे बनवण्याचे अतिशय महत्त्वाचे कंत्राट केआरएएसला मिळाले आहे.

राफेल आणि केआरएएस यांच्यात झालेल्या या कराराप्रसंगी राफेलचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि हवाई आणि क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणा विभागाचे सरव्यवस्थापक ब्रिगेडिअर जनरल (निवृत्त) पिनियंगमन यांनी कल्याणी राफेल अॅडव्हान्स सिस्टम्स लि.ला कंत्राट सुपूर्त केले आहे. 
 
केआरएएस ही राफेल अॅडव्हान्स्ड सिस्टिम्स आणि कल्याणी स्ट्रेटेजिक सिस्टीम्स लि. यांच्यातील 49 : 51 गुणोत्तरानुसार संयुक्त भागीदार असून भारतीय भागिदाराचा त्यातील वाटा 51 टक्के आहे. ‘मेकइन इंडिया’शी असलेली बांधिलकी जपत संयुक्त भागिदारांनी सर्वोत्तम उत्पादन सुविधा,अत्याधुनिक अभियांत्रिकी सेवा आणि विस्तारित लाइफसायकल सपोर्ट (एमआरओ) सिस्टीम्समध्ये भारतीय संरक्षण दलास पुरवण्यासाठी गुंतवणू केलेली आहे. केआरएएस 2023 पर्यंत आपली कर्मचारी संख्या वाढवून 300 टेक्निकल तंत्रज्ञांपर्यंत नेण्याची अपेक्षा आहे.

राफेल अॅडव्हान्स्ड डिफेन्स सिस्टीम्सला भारताच्या संरक्षण क्षेत्राशी सहकार्याचा समृद्ध इतिहास लाभला असून, त्यातूनच विविध संयुक्त भागिदारी, उपकंपन्या तसेच माहितीचे फलदायी आदानप्रदान उदयास आले आहे. गेल्या दोन दशकांत झालेल्या या भागीदाऱ्यांद्वारे राफेलने भारतात आपल्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाच्या माध्यमातून 25 कोटी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.

कराराप्रसंगी झालेल्या समारंभात ब्रिगेडियर (निवृत्त) पिनियंगमन यांनी भारतीय सैन्य आणि भारतीय हवाई दल(आयएएफ) यांच्या कामकाजासाठी आवश्यक तयारी करून देण्यावर जोर दिला.

ते म्हणाले,‘केआरएएस तसेच मेक इन इंडिया उपक्रमात आम्ही बजावत असलेल्या भूमिकेचा आणि भारताच्या संरक्षण उद्योगातील दमदार गुणवत्तेशी असलेल्या नात्याचा राफेलमध्ये आम्हा सर्वांना अभिमान वाटतो. या प्रकल्पाची सांगता होत असताना यापुढेही केआरएएस तसेच बीडीएलसारख्या भारतातील इतर भागिदारांबरोबर आणखी विक्रमी टप्पे साजरे करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.’

भारताचे जागतिकीकरण करण्यात आणि 'मेक इन इंडिया' उपक्रमाला जागतिक ब्रँड बनवण्यात कल्याणी समूहाने कायमच आघाडीची भूमिका बजावली आहे. आपल्या संरक्षण व्यवसाय उद्योगातही समूहाने याच तत्वज्ञानाचे अनुकरण केले असून डीआरडीओ, डीपीएसयू आणि संयुक्त भागीदारांबरोबर यशस्वी संबंध जोडलेले आहेत.

कल्याणी समूहाचे अध्यक्ष बाबा कल्याणी म्हणाले, ‘हे कंत्राट आपल्या देशात अस्तित्वात असलेल्या क्षमतांची आणि त्यांचा मेक इन इंडियाचे ध्येय खऱ्या अर्थाने साकार करण्यासाठी कशाप्रकारे वापर होऊ शकतो, याचे उत्तम उदाहरण आहे. कल्याणी समूहाला या कामगिरीचा आणि राफेलसोबत असलेल्या नात्याचा अभिमान वाटतो. याचप्रकारे आम्ही आणखी कंत्राटांचीही अंमलबजावणी करू असा विश्वास आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kalyani Rafael Advanced Systems bags gets 680 Crores contract from RAFAEL