खादी उद्योग कात टाकतोय

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 मे 2017

खादीच्या विक्रीत तब्बल 33 टक्‍क्‍यांची वाढ झाली असून ती आता रु. 2005 कोटींवर पोचली आहे. वर्ष 2015-16 मध्ये रु. 1,635 कोटी रुपयांची विक्री नोंदवली होती. खादी ग्रामोद्योग आणि ग्रामीण भागातून येणारे मध, साबण, शृंगार साहित्य, फर्निचर, सेंद्रिय औषधांना मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे.

नवी दिल्ली : खादी आणि त्यासंबंधित उत्पादनांच्या विक्रीने पहिल्यांदाच 50 हजार कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. केंद्र सरकारने खादी विक्रीला दिलेल्या प्रोत्साहनामुळे खादी उद्योग आता कात टाकतोय, असे चित्र निर्माण झाले आहे. 

खादी व ग्रामोद्योग आयोगाने (केव्हीआयसी) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, सरलेल्या आर्थिक वर्षात खादी आणि ग्रामोद्योगाची विक्री 24 टक्‍क्‍यांनी वाढली असून रु.50 हजार कोटींवर पोचली आहे. खादीच्या विक्रीत तब्बल 33 टक्‍क्‍यांची वाढ झाली असून ती आता रु. 2005 कोटींवर पोचली आहे. वर्ष 2015-16 मध्ये रु. 1,635 कोटी रुपयांची विक्री नोंदवली होती. खादी ग्रामोद्योग आणि ग्रामीण भागातून येणारे मध, साबण, शृंगार साहित्य, फर्निचर, सेंद्रिय औषधांना मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. 

'केव्हीआयसी'चे अध्यक्ष विनई कुमार सक्‍सेना याबाबत बोलताना म्हणाले की, 'सध्या परदेशात खादीची थेट निर्यात करत नसलो तरी आम्ही खादीला आंतरराष्ट्रीय बनवणार आहोत. 

खादीच्या वाढत्या प्रसारामुळे आणि सरकारने खादी उद्योगाला दिलेल्या प्रोत्साहनामुळे बॉंबे डाईंग आणि रेमंड यांसारख्या कंपन्यांना मोठी स्पर्धा करावी लागते आहे. खादी व ग्रामोद्योग आयोगाने पुढच्या वर्षी (2018-19) खादी विक्रीच्या माध्यमातून पाच हजार कोटींच्या उलाढालीचे उद्दिष्ट ठेवले आहे. सरकारचे खादीच्या उत्पादनांना प्रोत्साहन देण्याबाबत धोरण असले तरी, ग्राहकांचा खादीकडे कल वाढत असून अनुकूलतेची भावना निर्माण होताना दिसत आहे. याआधी राजकीय वर्तुळाकडूनच खादीला प्राधान्य दिले जात होते. आता मात्र चित्र पालटले आहे.

Web Title: Khadi sales reach new high