किंगफिशर ग्राऊंडेड...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 एप्रिल 2017

वडील आणि उद्योगपती विठ्ठल मल्ल्या यांच्या अकाली निधनानंतर तिशीच्या उंबरठ्यावरील विजय मल्ल्या यांनी वयाच्या 28 व्या वर्षी युनायटेड ब्रुअरीज कंपनीची धुरा स्वीकारली. भारतातल्या कॉर्पोरेट जगतात मानाचे पान मिळालेल्या मल्ल्यांच्या कर्तृत्वाने भरारी घेतली ती त्यांच्या किंगफिशर एअरलाइन्सच्या पदार्पणाने आणि त्यांचे उंच हवेत घिरट्या घालणारे ऐश्‍वर्याचे, दिमाखदारपणाचे, कॉर्पोरेटला भुरळ घालणाऱ्या स्टाइलचे विमानही किंगफिशर एअरलाइन्स अडचणीत आल्याने जमिनीवर ग्राऊंड झाले ते त्यांचे कंबरडे मोडणारे ठरले. ज्या राज्यसभा सदस्यत्वाने ते उद्योगजगतात मिरवायचे त्याचाच गैरफायदा घेत ते देशाबाहेरही दूर निघून गेले.

 • मे 2005 : किंगफिशर एअरलाइन्सचे पहिले विमान आकाशात झेपावले
 • जून 2007 - 'किंगफिशर'कडून एअर डेक्कनची खरेदी
 • मार्च 2010 - 'किंगफिशर'ची आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू
 • नोव्हेंबर 2010 - 'किंगफिशर'वरील कर्जाचा बोजा सहा हजार कोटी
 • डिसेंबर 2011 - 'किंगफिशर'ची 11 खाती 70 कोटींच्या सेवाकरासाठी गोठवली
 • ऑक्‍टोबर 2012 - हवाई वाहतूक प्राधिकरणाकडून किंगफिशर एअरलाइन्सचा परवाना स्थगित
 • ऑगस्ट 2013 - स्टेट बॅंकेने येणी वसुलीसाठी मुंबई विमानतळाजवळील किंगफिशर हाउस इमारत ताब्यात घेतली
 • सप्टेंबर 2014 - युनायटेड बॅंक ऑफ इंडियाकडून मल्ल्या स्वयंघोषित कर्जबुडवा (विलफुल डिफॉल्टर) जाहीर
 • युनायटेड स्पिरिट लिमिटेड (यूएसएल) आणि युनायटेड ब्रुअरीज लिमिटेड (यूबीएल) यांच्यावरील नियंत्रण गमावलेल्या मल्ल्यांनी मंगलोर केमिकल्स अँड फर्टिलायझर्सवरील नियंत्रण गमावले
 • नोव्हेंबर 2015 - स्टेट बॅंकेच्या नेतृत्वाखालील 17 बॅंकांच्या गटाशी 'किंगफिशर'ची लढाई निर्णायक वळणावर. बॅंकांकडून मल्ल्यांसह दोन कंपन्या स्वयंघोषित कर्जबुडव्या जाहीर
 • फेब्रुवारी 2016 - 'युनायटेड स्पिरिट'च्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत मल्ल्याला पद सोडण्यास सांगितले
 • 4 मार्च 2016 - कर्जवसुली लवादाकडे (डीआरटी) स्टेट बॅंकेने धाव घेऊन मल्ल्याला मिळणाऱ्या 75 दशलक्ष डॉलरवर हक्क सांगण्यासाठी धाव घेतली. मल्ल्यांना देशाबाहेर जाऊ न देण्यासाठी बॅंकांच्या वतीने प्रयत्न.
 • 9 मार्च 2016 - दिआज्जोकडून चार कोटी डॉलर घेऊन (270 कोटी रुपये) मल्ल्या भारताबाहेर पसार झाल्याचे सर्वोच्च न्यायालयासमोर सरकारने सांगितले.
 • 2017 - परराष्ट्र मंत्रालयाने ब्रिटिश सरकारकडे मल्ल्यांच्या प्रत्यार्पणाची मागणी केली, त्यानुसार न्यायालयाकडे प्रकरणही गेले. एप्रिलमध्ये मल्ल्या यांचा गोव्यातील किंगफिशर व्हिला हा बंगला अभिनेता, व्यावसायिक सचिन जोशी यांनी 73.01 कोटी रुपयांना स्टेट बॅंकेच्या नेतृत्वाखाली बॅंकांच्या महासंघाकडून विकत घेतला.
 • 18 एप्रिल 2017 - ब्रिटनमध्ये मल्ल्या यांना अटक व जामिनावर सुटका

दहा हजार कोटींचा डोंगर
मल्ल्या याच्या डोक्‍यावर या घडीला बॅंकांची देणी, करांची देणी आणि त्यावरील व्याज अशी एकूण रक्कम साधारण 10 हजार कोटींच्या आसपास होते. यामध्ये टीडीएसपोटी 372 कोटी, सेवाकरापोटी 535 कोटी आणि व्याज आणि दंडापोटी 2110 कोटी रुपये अशी एकूण नऊ हजार 907 कोटी रुपयांची देणी आहेत.

मल्ल्यांची मालमत्ता
विजय मल्ल्या याच्याकडे विविध कंपन्यांमधील शेअर, स्थावर मालमत्ता, स्टड फार्म, व्हिंटेज मोटारी, विमाने अशी मालमत्ता आहे. त्याची एकूण मालमत्ता चार हजार 393 कोटी रुपयांच्या आसपास आहे.
(सकाळ संशोधन आणि विकास विभाग)

Web Title: kingfisher grounded : vijay mallya's arrest