कोसळता कोसळे पाऊस आणि बाजारही

कोसळता कोसळे पाऊस आणि बाजारही

शेअर बाजार वर जाताना जिन्याने जातो तर खाली येताना लिफ्टनं येतो, असं म्हटलं जातं. त्याचं तंतोतंत प्रत्यंतर गेल्या आठवड्यात आलं. जागतिक बाजार मंदीत उघडले, तसे देशी बाजारही सोमवारी नैराश्‍यपूर्ण वातावरणातच उघडले आणि त्याच प्रकारे बंद झाले. बीएसई निर्देशांक २९६ अंशांनी (३१,६२६), तर निफ्टी ९१ अंशांनी (९८७३) खाली बंद झाले. २९ ऑगस्टपासूनची ही सर्वात मोठी घट. प्रत्येक एका चढत्या शेअरमागे तीन शेअर घसरले होते.

खासगी बॅंका, रिॲलिटी शेअर्स हे घसरण्यामधले प्रमुख घटक होते. ल्युपिन (-२ टक्के), नोव्हास्टीस्‌ (७ टक्के), औषध कंपन्यांतील हे शेअरही घसरले. नाही म्हणायला कॅपॅसिट इन्फ्राप्रॉजेक्‍ट हा २५० रुपयाला आयपीओमधून व १८३ पट जादा भरणा झालेला शेअर मात्र ३१ टक्केवर, ३४२ रु.वर बंद झाला. नशीबवान लोकांना १५००० च्या गुंतवणुकीवर ६००० रु. फायदा झाला. भेलच्या अंतिम ३९ टक्के लाभांश (एकूण ७९ टक्के) व दोनास एक बोनसवर शिक्कामोर्तब ही मंगळवारची प्रमुख घटना. बाजार मात्र सुस्तच होता. लगेच दुसऱ्या दिवशी भारतीय लष्करानं म्यानमारच्या हद्दीवर सर्जिकल स्ट्राईक केला, अशा बातमीनं बाजार कोसळला तो चांगला ४४० अंशांनी (३१,१६० बीएसई सेन्सेक्‍स). निर्देशांक जवळ जवळ ३ महिन्यांच्या तळाच्या स्तरांवर बंद झाले. सरळ सरळ सलग सातव्या दिवशीची ही घसरण! 

परतीच्या पावसानं धुमाकूळ माजवला आहे. रस्त्यात गुडघा गुडघाभर पाणी झालं आहे आणि त्याच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय हवामान खातं मात्र देशात सरासरीपेक्षा ५ टक्के कमी पाऊस झाल्याचं सांगते, ही मजेशीर गोष्ट! शेवटचे दोन दिवस बाजार तसा निवांतच होता. फारच चंचलता अनुभवयास मिळाली. सकाळच्या सत्रात बाजार तेजी दाखवे; पण बंद होताना पुनः दिवसाच्या तळावर.

संपूर्ण आठवड्याचा विचार केला, तर मागील दोन आठवड्यांसारखीच चालू आठवड्यानंही मुंबई निर्देशांकानं ६३९ अंश तर निफ्टीनं १७६ अंश घसरण नोंदवली.
गुरुवारच्या सप्टेंबर सत्राच्या अखेरच्या दिवसामुळं आठवडाभर बाजारात बऱ्यापैकी चंचलता होती.

आयसीआयसीआय लोंबार्ड या ६६१ रु.ला दिलेल्या आयपीओचं चालू आठवड्यात लिस्टिंग झालं तेच मुळी पाच-सहा रुपये खालच्या भावानं. (अर्ज करणाऱ्या सर्व लहान गुंतवणूकदारांना हे शेअर्स ॲलॉट झाले होते) पण ब्लॉक डीलमुळं सुरुवातीची मरगळ नाहीशी झाली आणि तो ६९४ पर्यंत (५ टक्के वर) चढला.

एसबीआय लाईफ इन्शु. आयपीओचा भरणा झाला खरा; पण तो जेमतेमच. सर्वच छोटे गुंतवणूकदार नशीबवान ठरले आहेत. ७०० रु. ला दिलेल्या या शेअर्सची इनिंग, मंगळवारी ३ तारखेला सुरू होते आहे. बघूया, लिस्टिंगदिवशी गुंतवणूकदारांच्या पदरात काय पडतं ते! सोशल मीडियानं जीवन ढवळून टाकलं आहे. शेअर मार्केटही त्याला अपवाद नाही. काही काही मजेशीर पोस्ट येत असतात. परवा एक पोस्ट आली होती.

सणासुदीनिमित्त ॲमॅझॉन इ.नी जाहीर केलेल्या ‘सेलकडं’ कशाला जाताय? ‘दलाल स्ट्रीटवर’ याहूनही एक मोठा सेल आहे. त्याकडं जा! गेल्या दोन आठवड्यांत शेअर बाजारात जी घसरण (१५ ते २० टक्के) झाली होती व आहे, त्याला उद्देशून ते होतं.
गोदरेज ॲग्रोवेटचा आयपीओ ४६० रु. दरानं ४ तारखेपासून खुला होत आहे. करड्या बाजारात त्याला २५ टक्के अधिमूल्य आहे. पोल्ट्री आणि फिश व्यवसायात कंपनी आहे. यावरूनही एक व्हॉटस्‌ॲपच आलाय. त्यांच्या उद्योगाकडं बघून कुणीतरी एका शाकाहारी विशिष्ट समाजातल्या बांधवांना आवाहन केलंय की या इश्‍यूला अर्ज करू नये. ही मजेशीर गोष्ट नाही का?

त्यानं काय साध्य होणार आहे? दारू, सिगारेटचे शेअर्स न घेणारेही मी पाहिले आहेत. आपल्या आपल्या ठिकाणी प्रत्येक जण बरोबर एवढंच इथं म्हणता येईल. असो.
इंडियन हॉटेलचा राईट इश्‍यू (रेकॉर्ड डेट ५ ऑक्‍टोबर, इश्‍यू साईज १५०० कोटी) १३ ऑक्‍टोबरला खुला होईल.

पाचास एक प्रमाणात ३६ टक्के कमी दरानं, ११६ चा ७५ ला शेअर मिळणार आहे. ११६ दर टिकल्यास व जादा शेअर मिळाल्यास रिटर्न बरे मिळेल (अल्पावधीसाठी). अशोक लेलॅंड (१२३), जिलेट इं. (५५९८), प्रॉक्‍टर गॅंबल (८४१७), राजेश एक्‍स्पोर्ट (८१७), प्रमुख शेअरनी ५२ आठवडे उच्चतम भाव दाखविले आहेत. नवीन आठवड्यातील वाटचालीवर ४ ऑक्‍टोबरच्या पतधोरणाचा परिणाम दिसावा. २ ऑक्‍टोबर, सोमवारी गांधी जयंतीनिमित्त बाजार बंद असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com