‘कर्ज, ठेवींचे व्याजदर कमी होणार’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016

मुंबई - जुन्या पाचशे आणि एक हजारच्या नोटा बदली करताना बॅंकांच्या ठेवींमध्ये मोठी वाढ होत आहे. ही प्रक्रिया ३० डिसेंबरपर्यंत सुरू राहणार असून, या कालावधीत बॅंकिंग यंत्रणेत मोठ्या प्रमाणात रोकड उपलब्ध होईल. यामुळे नजीकच्या काळात कर्ज आणि ठेवींवरील  व्याजदर कमी होतील, असे सूतोवाच भारतीय स्टेट बॅंक अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी केले. याचा कर्जदारांना फायदा होणार असला तरी ठेवीदारांना मात्र याची झळ सोसावी लागणार आहे.

चलनी नोटा बदलीच्या प्रक्रियेत आतापर्यंत बॅंकांकडे  ३.१२ लाख  कोटी रुपये जमा झाले आहेत. त्याचबरोबर बॅंकांकडून ग्राहकांना ५० हजार कोटी देण्यात आले आहेत. पैसे काढण्यावर मर्यादा असली तरी खात्यात पैसे जमा करण्यास बंधन नाही. त्यामुळे येत्या काही दिवसांत मोठी रक्कम जमा होईल. व्याजदरांबाबत विचारले असता भट्टाचार्य म्हणाल्या की, नोटा बदली करण्याच्या मोहिमेमुळे बॅंकिंग व्यवस्थेत प्रचंड प्रमाणात रोकड उपलब्ध झाली आहे. यामुळे बॅंकांना रोखतेची चणचण भासणार नाही. नजीकच्या काळात त्यांना व्याजदर कमी करावे लागतील. मात्र, हा निर्णय कधी होईल, हे सांगण्यास त्यांनी नकार दिला.  

बहुतांश ग्राहकांकडून नोटा बदली करण्याऐवजी बॅंक खात्यात जमा पैसे जमा करण्याचा पर्याय निवडला जात आहे. परिणामी बचत आणि चालू खात्यातील ठेवींची रक्कम मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरांत बॅंक खात्यात पैसे जमा करण्याचे प्रमाण जास्त असल्याचे भट्टाचार्य यांनी सांगितले. बॅंकांकडून पूर्ण क्षमतेने नोटा बदलण्याची प्रक्रिया राबवली जात असून ३० डिसेंबर हे उद्दिष्ट साध्य होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. 

एटीएम मशिनमधील बदलाची प्रक्रिया सुरू 

एटीएम मशिनमधील बदलाची प्रक्रिया झपाट्याने सुरू असून मुंबईसह राज्यात ५०० रुपयांच्या नव्या नोटा एसबीआयच्या एटीएममध्ये उपलब्ध होतील, अशी माहिती त्यांनी दिली. गेल्या चार दिवसांत नेट बॅंकिंग व्यवहारांमध्ये ३०० टक्के आणि मोबाईल ॲप व्यवहारांमध्ये १४० टक्‍क्‍यांची वाढ झाली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loan, deposit rate will be reduced