महात्मा गांधींचे अर्थशास्त्र

महात्मा गांधींचे अर्थशास्त्र

महात्मा गांधी यांनी अर्थशास्त्राच्या परिभाषेत अर्थशास्त्र सांगितले नाही. आर्थिक विकासापेक्षा उच्च सामाजिक आणि वैयक्तिक मूल्ये स्थापित करण्यावर त्यांनी अधिक भर दिला. मात्र त्यातून आर्थिक प्रश्नांची उत्तरे नक्की मिळतात. त्यांचे अर्थशास्त्र हे नैतिक आणि सामाजिक असून त्यांच्यातून सर्व भारतीयांना मोठा संदेश मिळतो. अर्थशास्त्राच्या परिभाषेत मांडले नसले तरी जीवन व्यवहाराशी संबंधित असे विचार महात्मा गांधींनी मांडले आहेत. 

‘खेड्याकडे चला’:
महात्मा गांधींनी त्यावेळी ‘खेड्यांकडे चला’ असा मोठा संदेश दिला होता. आजच्याप्रमाणेच त्यावेळी देखील ग्रामीण अर्थव्यवस्था महत्त्वाची होती. मात्र आज देखील देशातील प्रत्येक शहरात वाढत जाणारा रोजगाराचा प्रश्न, वाढती गर्दी, गुन्हेगारी यामुळे गांधीजींचा ‘खेड्यांकडे चला’ संदेश आजही या आर्थिक समस्येचे निराकरण करण्याचा मार्ग सुचवतो. देशातील बहुसंख्य जनता प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रीतीने ग्रामीण अर्थव्यवस्थेवर अवलंबून आहे. देशाची आर्थिक प्रगती कृषी ग्रामीण विकासावर अवलंबून आहे. कृषी ग्रामीण क्षेत्रातील उत्पादकता, गुंतवणूक, रोजगारनिर्मितीचे महत्त्व या संदेशातून गांधीजींनी अधोरेखित केले होते. त्यांच्या कल्पनेप्रमाणे जर प्रत्येक गाव स्वयंपूर्ण झाले तर भारताला फार मोठा आर्थिक विकास साधणे शक्य होईल. ग्रामीण विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याचे महत्त्व गांधींनी स्वातंत्र्यापूर्वीच सांगितले होते.

 ‘चरखा’: 
‘खेड्याकडे चला’ असा संदेश देण्याबरोबरच कृषीसंबंधित श्रमप्रधान उद्योगांचे महत्त्व गांधीजींनी सांगितले आहे. ग्रामीण भागातील जनेतला स्वयंपूर्ण करण्यासाठी गांधीजींनी कुटिरोद्योगाचे महत्त्व पटवून दिले आहे.  ‘चरखा’ ते त्याचे उत्तम उदाहरण त्यांनी सर्वांसमोर ठेवले. कमी भांडवलाच्या आणि जास्तीत जास्त रोजगार देणाऱ्या लहान उद्योगांची स्थापना करून ग्रामीण विकासाचा मंत्र त्यांनी दिला. 

स्वदेशीचा नारा:
स्वदेशीचा फार व्यापक आणि देशाच्या प्रगतीसाठी समर्पक अर्थ गांधीजींनी आपल्यासमोर ठेवला. सध्या जगभरात मंदीचे वातावरण आहे. त्यामुळे बऱ्याच देशांची अर्थव्यवस्था मोडकळीस आली आहे. त्यावर देखील गांधीजींनी ''स्वदेशी म्हणजे देशाची स्वयंपूर्णता'' असा मंत्र दिला आहे. जागतिक मंदीचा सामना करण्यासाठी देशांतर्गत उत्पादन व मागणीला महत्त्व देणे गरजेचे आहे. परदेशी वस्तूंचा वापर केल्याने आपले चलन परदेशात खर्च करावे लागते. सध्याच्या काळात वाढत्या कच्च्या तेलाच्या किमती यामुळे देशाची आयात, व्यापार तूट, परदेशी चलनांच्या तुलनेत  रुपयाचे घटते मूल्य सर्व समस्यांच्या मुळाशी गांधीजींच्या कल्पनेतील स्वदेशी मूल्याचे महत्त्व समजून येते. 

गांधीजींचे विचार हे भारतीय अर्थव्यवस्थेला धरून होते. त्यांनी अनियंत्रित भांडवलशाहीतील नफेखोरी, संपत्तीसंचय, आर्थिक शोषण अशा सर्व अतिरेकी वैशिष्ट्यांना गांधीजींनी  विरोध केला होता. परिणामी पाश्चिमात्य देशातील आर्थिक संकटांसारख्या धोक्यांपासून भारत दूर राहू शकतो. याचबरोबर सत्य आणि अहिंसा या मूल्यांचे महत्त्व आजही कमी झालेले नाही. आजच्या डिजिटल युगात फक्त आपल्याला गांधीजींच्या विचारांचे नवे संदर्भ शोधण्याची गरज आहे. त्यासाठी गांधीजींप्रमाणे सत्य आणि अहिंसेचा मार्ग प्रामाणिकपणे अंगिकारला जाणे गरजेचे आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com