औद्योगिक उत्पादनाने घेतला ‘वेग’

वृत्तसंस्था
मंगळवार, 1 नोव्हेंबर 2016

मॅन्युफॅक्चरिंग उत्पादनात वाढ झाली आहे आणि भारताबाहेरील ग्राहकांकडून नवीन ऑर्डर प्रवाह मिळाल्याने निक्केई इंडिया खरेदी व्यवस्थापक निर्देशांक वधारला आहे

नवी दिल्ली : विद्युत उपकरण, वाहननिर्मिती; तसेच ऊर्जा निर्मिती क्षेत्रातील भरीव कामगिरीच्या जोरावर औद्योगिक उत्पादनाचा वेग वाढला आहे. परिणामी भारताच्या मॅन्युफॅक्चरिंग उत्पादन क्षेत्रात ऑक्टोबर महिन्यात तेजी आली आहे. ऑक्टोबर महिन्यात मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला नवीन मिळालेले कंत्राट आणि मॅन्युफॅक्चरिंग उत्पादनांची मागणी वाढली.

भारताचा खरेदी व्यवस्थापक निर्देशांक (परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्स-पीएमआय) 22 महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोचला आहे. निक्केई पीएमआय ऑक्टोबर महिन्यात 54.4 वर पोचला आहे. सप्टेंबरमध्ये हा निर्देशांक 51.1 पातळीवर होता.

"मॅन्युफॅक्चरिंग उत्पादनात वाढ झाली आहे आणि भारताबाहेरील ग्राहकांकडून नवीन ऑर्डर प्रवाह मिळाल्याने निक्केई इंडिया खरेदी व्यवस्थापक निर्देशांक वधारला आहे." असे निक्केई इंडियाचे अर्थतज्ज्ञ डी लिमा पोलीॅना म्हणाले.

निर्देशांक 50 अंशांपेक्षा अधिक पातळीवर जाणे आर्थिक विस्तार सुरू असण्याचे निदर्शक असून, तो त्यापेक्षा खाली आल्यास आर्थिक घसरण होत असल्याचे मानले जाते. नवे व्यवसाय सुरू होण्याचे प्रमाण वाढल्याने आणि विस्ताराच्या वेगात वाढ होत असल्याने पीएमआय वधारला आहे. पुढील काळात ही वाढ सुरू राहण्याची चिन्हे आहेत.

Web Title: Manufacturing sector in India gets boost in October