शेअर बाजारातील घसरगुंडी सुरूच

BSE
BSE

मुंबई : मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍समधील घसरण सलग सातव्या सत्रात बुधवारी कायम राहिली. रिझर्व्ह बॅंकेने पतधोरण आढाव्यात व्याजदरात कोणतेही बदल न करता आर्थिक विकासाचे अंदाजही कमी केल्याचा परिणाम शेअर बाजारावर झाला. 

रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण समितीने अपेक्षेप्रमाणे व्याजदरात कोणतेही बदल केले नाहीत. याचबरोबर चालू अर्थिक वर्षात विकासदराचा अंदाज 6.7 टक्‍क्‍यांवरून कमी करून 6.6 टक्‍क्‍यांवर आणला. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये नकारात्मक वातावरण निर्माण झाले.

जागतिक पातळीवरील सकारात्मक घडामोडींमुळे सेन्सेक्‍स आज सकाळी 470 अंशांनी वधारला होता. मात्र, त्यानंतर सुरू झालेल्या नफेखोरीच्या वातावरणामुळे त्यात घसरण होऊन तो 34 हजार 8 अंश या दिवसभरातील नीचांकी पातळीवर आला. अखेर कालच्या तुलनेत सेन्सेक्‍स 113 अंशांनी घसरून 34 हजार 82 अंशांवर बंद झाला. सेन्सेक्‍समध्ये सलग सात सत्रांमध्ये 2 हजार 200 अंशांपेक्षा अधिक घसरण झाली आहे. दरम्यान, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 21 अंशांची घसरण होऊन 10 हजार 476 अंशांवर बंद झाला. 

युरोपीय बाजारांमध्ये तेजी 
आशियाई देशांतील शेअर बाजारांमध्ये आज संमिश्र वातावरण होते. जपानच्या निक्केई निर्देशांकामध्ये 0.16 टक्के वाढ झाली. हॉंगकॉंगच्या हॅंगसेंग निर्देशांकात 0.89 टक्के, तर चीनच्या शांघाय निर्देशांकात 1.82 टक्के घसरण झाली. युरोपीय देशांतील शेअर बाजारांमध्ये आज सुरवातीच्या सत्रात तेजी दिसून आली. फ्रॅंकफर्टच्या डॅक्‍स निर्देशांकात 0.66 टक्के, पॅरिसच्या सीएससी 40 निर्देशांकात 0.68 टक्के आणि लंडनच्या एफटीएसई निर्देशांकात 0.55 टक्के वाढ झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com