आधी गुंतवणूक, नंतर खर्च

दिवाकर कुलकर्णी
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी ६.३० ते ७.३० या वेळेत शेअर बाजारांनी विशेष सेशन ठेवलं होतं. विशेष सत्राच्या आधीच्या चर्चेत सर्व विश्‍लेषक तेजीचे अनुमान वर्तवत होते. त्या सर्वांना बाजाराने धोबीपछाड दिली. बीएसई निर्देशांक १९४ अंशांनी, तर निफ्टी ६४ अंशांनी घसरले व अनुक्रमे ३२,३९० व १०,१४७ वर बंद झाले.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी ६.३० ते ७.३० या वेळेत शेअर बाजारांनी विशेष सेशन ठेवलं होतं. विशेष सत्राच्या आधीच्या चर्चेत सर्व विश्‍लेषक तेजीचे अनुमान वर्तवत होते. त्या सर्वांना बाजाराने धोबीपछाड दिली. बीएसई निर्देशांक १९४ अंशांनी, तर निफ्टी ६४ अंशांनी घसरले व अनुक्रमे ३२,३९० व १०,१४७ वर बंद झाले.

हे विशेष सत्र अल्प काळाकरिता व सणासुदीच्या वेगळ्या माहोलमध्ये असते. त्यामुळे त्यातील वाढघट किंवा कल हे शाश्‍वत धरता येत नाहीत हे जरी खरं असलं तरी गेल्या काही वर्षांचे मुहूर्त व्यवहाराचे आकडे न्याहाळता असं दृष्टोत्पत्तीस येतंय की, २००७ पासून २०१७ पर्यंत कधीही मुहूर्त ट्रेडिंगला बाजार एवढा कोसळला नव्हता. २००७ साली ०.७९ टक्के बाजार घसरला होता. यंदा तो ०.६० टक्‍क्‍यांनी घसरला आहे. जागतिक शेअर बाजारातील मंदी हे एक कारण असेल किंवा फायदा वसुलीही असू शकेल.

शुक्रवारी बाजार बंद होता 
समभागाचा ताळा घ्यायचा म्हटल्यास गेल्या आठवड्यात अशोक लेलॅंड (१२९१), अवंती फीडस्‌ (२६७५), बाटा (७९२), ब्रिटानिया (४६३१), फिनोलक्‍स इंड. (७३८), जीएनएफसी (४७२), एमओआयएएल (२४४), पेट्रेनेट (२६१) आणि सर्वांत वर रिलायन्स इंड. (९१०) यांची कामगिरी मजबूत व दमदार राहिली. बुधवारी एकाच दिवशी काही उत्साहवर्धक बातम्या (किंवा अफवा) त्यामुळं रिलायन्स इंडस्ट्रीज एकाच दिवसात ४.५ टक्के वाढला.

शेअर मार्केटची लीला कशी असते बघा. दोन सख्ख्या भावांच्या शेअरची परिस्थिती बघा. एका भावाच्या (मुकेश अंबानी) शेअरला आभाळ ठेंगणं वाटायला लागलंय! एका वर्षात ६० टक्‍क्‍यांहून अधिक वाढ. रिलायन्स इंड! तर दुसऱ्या भावाच्या (अनिल अंबानी) शेअर्सची बाजारात गेल्या वर्षात घसरण झाली. रिलायन्स कम्युनिकेशनची ६५ टक्के घट. रिलायन्स पॉवर १७ टक्के घट. रिलायन्स कॅपिटलचा जेमतेम 

भाव टिकलाय
नवीन आयपीओची कहाणी मागील पानावरून पुढे अशीच चालू आहे. (निदान अजून तरी!) गेल्या आठवड्यात मास फायनान्शिअल सर्व्हिसेस हा ४५९ रुपये दिलेला शेअर नेहमीप्रमाणं वरच्या भावात लिस्ट झाला. त्याचा शेवटचा भाव आहे ६५७ (४३ टक्के वर).

येत्या आठवड्यात इंडियन एनर्जी व जनरल इन्शु. हे दोन आयपीओ लिस्ट होतील. इथं मात्र प्रीमियमची अपेक्षा नाही आहे. दोन्हींचाही किरकोळ गुंतवणूकदाराचा भरणा जेमतेम झाला आहे. जनरल इन्शुरन्स तर सर्वांनाच शेअर मिळतील.

२५-१० पासून रिलायन्स, निफो लाइक हा २४७ ते २५२ रेंजमध्ये दिला जाणारा ६१ कोटी रुपयांचा आयपीओ खुला होत आहे. ‘ग्रे’ मार्केटमध्ये आजच्या तारखेला २५ टक्के अधिमूल्य आहे. 

पाठोपाठ हक्क शेअर्स (इंडियन हॉटेल्स) येत आहेत. बाय बॅकही (विप्रो, इन्फोसिस - रेकॉर्ड डेट १ नोव्हेंबर) रांगेत उभे आहेत. गुंतवणूकदारांना अनेक प्रकार उपलब्ध असतात. चौफेर नजर पाहिजे. मित्रमंडळींचा तसा ग्रुप पाहिजे. वैध मार्गानं तुम्ही तुमची संपत्ती सर्वसामान्यांपेक्षा (बॅंक-डिपॉझिटातले) अधिक तेजीत वृद्धिंगत करू शकता.

चांगल्या म्युच्युअल फंडात नेमानं (एसआयपी) गुंतवणूक करत राहणं हा एक अधिक आखुडशिंगी, बहुदुधी प्रकारचा प्रत्यक्ष अस्तित्वात असलेला प्रकार. अनेक लोक सध्या तो अंगिकारताहेत. गेल्या ५/७ वर्षांत सोन्यानं तर रिटर्न अगदीच मामुली दिले आहे. शेअर्सनं सरासरी ९ ते १२ टक्के दिलंय; पण एसआयपींनी १५ ते ३० टक्के  रिटर्न दिली आहेत. त्यामुळे ‘हिरा! है सदा के लिये’ असं याबाबतीत म्हणता येईल. आपल्या गरजेनुसार, उद्दिष्टानुसार धोका पत्करण्याच्या स्वभावानुसार आणि गुंतवणुकीसाठी उपलब्ध धनराशीनुसार साधा (कॉन्झर्व्हेटिव्ह - परंपरागत) कातडीबचावू  (डिफेन्सिव्ह - स्वसंरक्षण प्रकार) किंवा धडाडीचा म्युच्युअल फंड (ॲग्रेसिव्ह) प्रकार निवडू शकता. फक्त गुंतवणुकीमध्ये एक चिरशाश्‍वत मूलमंत्र म्हणजे ‘आधी गुंतवणूक, मग खर्च’ हा शीर्षासनी मंत्र अंगिकारला पाहिजे. तुमची सत्ता तुमच्या डोळ्यांसमोर वाढताना तुम्हाला दिसेल.

पाडव्याच्या (मुहूर्तावर कोटी-कोटींच्या) दुचाकी-चारचाकी, इलेक्ट्रॉनिक्‍स वस्तू, सोनं-नाणं, खरेदी केलं गेलं आहे. आकडेवारी डोळे दिपवणारी आहे. त्यामुळं शेअर बाजारातही त्याचे पडसाद उमटत आहेत. उमटणार आहेत.
सर्वच जण तेजीची झुळूक अनुभवूया!

टेलिकॉम, धातू, ॲटो किंबहुना फार्मा सेक्‍टरसुद्धा तेजी चालू साली दाखवेल, असा होरा आहे. बहुतांशी ब्रोकरगृहानी नवीन संवत्सरात, रिलायन्स इंडस्ट्रीज, मारुती, एल अँड टी, सन फार्मा, टाटा मोटर्स या लार्ज कंपन्यांना प्राधान्य द्यावं, असं सुचवलं आहे. गोदरेज ॲग्रोव्हेट हा डार्क हॉर्स ठरू शकतो, (व्यंकिजप्रमाणे) असंही ते म्हणतात. गुंतवणुकीसाठी शुभेच्छा.

Web Title: Market watch by Divakar Kulkarni