खूशखबर ! अर्थव्यवस्थेला गती; वाहन विक्री वाढली

वृत्तसेवा
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

देशातील वाहन उत्पादक कंपन्यांनी ऑक्टोबर महिन्यात चांगली कामगिरी केली आहे. आघाडीच्या कंपन्या असलेल्या मारूती सुझुकी, बजाज ऑटो आणि महिंद्रा अँड महिंद्रा या कंपन्यांच्या वाहन विक्रीमध्ये वाढ झाल्याचे समोर आले आहे.

नवी दिल्ली : देशातील वाहन उत्पादक कंपन्यांनी ऑक्टोबर महिन्यात चांगली कामगिरी केली आहे. आघाडीच्या कंपन्या असलेल्या मारूती सुझुकी, बजाज ऑटो आणि महिंद्रा अँड महिंद्रा या कंपन्यांच्या वाहन विक्रीमध्ये वाढ झाल्याचे समोर आले आहे. मारुती सुझुकीच्या वाहनांच्या विक्रीत ऑक्टोबर महिन्यात 4.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे गेल्या 16 महिन्यात ही सर्वाधिक वाढ ठरली आहे. ऑक्टोबर महिन्यात एकूण 1 लाख 53 हजार 435 वाहनांची विक्री झाली. सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत त्यात 25.4 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

सरलेल्या तिमाहीत वाहन विक्रीत सातत्याने घट होत असताना ही आकडेवारी 'ऑटो' क्षेत्राला दिलासा देणारी आहे. गेल्या काही महिन्यांपासून सर्व वाहन कंपन्यांच्या विक्रीत मोठी घट झाली होती. मारुती सुझुकीला त्याचा मोठा फटका बसला होता. मारूती सुझुकी इंडियाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी याच महिन्यात कंपनीने 1 लाख 46  हजार 766 वाहने विकली होती. तर सप्टेंबर 2019 मध्ये 1 लाख 22 हजार वाहनांची विक्री केली होती. बजाज ऑटोने देखील दमदार कामगिरी केली आहे.

बजाज ऑटोचे कार्यकारी संचालक राकेश शर्मा म्हणाले,''बजाज ऑटोच्या आजपर्यंतच्या इतिहासात किरकोळ विक्री व्यवसायात सर्वाधिक वाढ झाली आहे. सणासुदीच्या हंगामात वार्षिक 28 टक्के वाढ नोंदवली आहे. बजाज ऑटोने ऑक्टोबरमध्ये ४.६३ लाख वाहने विकली आहेत. गेल्या महिन्याची तुलना केल्यास या महिन्यात वाहनांची विक्री १५.२ टक्क्यांनी वाढली आहे. सप्टेंबरमध्ये 4.02 लाख वाहनांची विक्री झाली होती.

महिंद्रा अँड महिंद्राच्या वाहनांच्या विक्रीतही गेल्या वर्षी ऑक्टोबरच्या तुलनेत 11 टक्क्यांनी घट झाली आहे. ऑक्टोबरमध्ये 2018मध्ये कंपनीने 58 हजार 416 कार विकल्या होत्या. तर सप्टेंबर 2019 मध्ये 43 हजार 343 वाहनांची विक्री केली. मात्र चालू वर्षात सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये विक्रीत वाढ झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maruti Suzuki India logs 4.5% growth in October sales