खनिज तेल उत्पादनात कपात ?

वृत्तसंस्था
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

विएन्ना - खनिज तेलाच्या उत्पादनात कपात करण्यावर ‘ओपेक’चे सदस्य असलेल्या बहुतांश देशांचे तूर्त एकमत झाले असून, ही कपात नेमकी किती असेल, हे ठरविण्यापूर्वी याबाबत रशियाचे मत काय, याची प्रतीक्षा ते करीत असल्याची माहिती सूत्रांनी आज दिली.

विएन्ना - खनिज तेलाच्या उत्पादनात कपात करण्यावर ‘ओपेक’चे सदस्य असलेल्या बहुतांश देशांचे तूर्त एकमत झाले असून, ही कपात नेमकी किती असेल, हे ठरविण्यापूर्वी याबाबत रशियाचे मत काय, याची प्रतीक्षा ते करीत असल्याची माहिती सूत्रांनी आज दिली.

खनिज तेल निर्यातदार देशांची संघटना असलेल्या ‘ओपेक’च्या दोनदिवसीय बैठकीस आज विएन्नातील मुख्यालयात सुरवात झाली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेल दरात सुरू असलेली घसरण रोखण्यासाठी कोणती उपाययोजना करायची यावर बैठकीत खल सुरू असून, तूर्त त्यात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. पुढील सहा महिन्यांसाठी तेल उत्पादनाची रूपरेषा ठरविण्यापूर्वी संघटनेत समावेश नसलेल्या इतर देशांचे मत जाणून घेण्यात येणार आहे. 

सौदी अरेबियाने खनिज तेलात प्रतिदिन १० लाख बॅरलची कपात करण्याचा प्रस्ताव बैठकीत ठेवला आहे. दरम्यान, कपातीसंदर्भात ओपेकच्या बैठकीत ठोस निर्णय होणार नसल्याच्या शक्‍यतेने जागतिक बाजारपेठेत खनिज तेल दरात आज ५ टक्‍क्‍यांपर्यंत घसरण नोंदविली गेली. त्याचा भाव ५९ डॉलर प्रतिबॅरलपर्यंत घसरला होता. मात्र, अखेर दोन टक्‍क्‍यांच्या घसरणीसह ५९.८६ डॉलरवर तो स्थिरावला.

तेल उत्पादक देशांसाठी सर्व पर्याय खुले असून, कपातीविषयी सर्वांचे एकमत होईपर्यंत आम्ही प्रतीक्षा करू. खनिज तेल उत्पादनात प्रतिदिन १० लाख बॅरलची कपात पुरेशी आहे.    
- खालिद अल-फली, सौदीचे ऊर्जामंत्री

रशियाची भूमिका गुलदस्तात 
रशियाचे ऊर्जामंत्री अलेक्‍झांडर नोवाक हे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी मायदेशी परतले असून, ते शुक्रवारी व्हिएन्नात दाखल होतील. त्यानंतर अतिंम निर्णय जाहीर करण्यात येईल. तत्पूर्वी हिवाळ्यात तेल उत्पादनात कपात अशक्‍यप्राय असल्याचे रशियाने स्पष्ट केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mineral oil Production Short