मिस्त्री, वाडिया घेणार भागधारकांचा कौल

पीटीआय
सोमवार, 28 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - टाटा मोटर्सच्या संचालक मंडळावरून सायरस मिस्त्री आणि स्वतंत्र संचालक नुस्ली वाडिया यांना हटविण्याच्या प्रस्तावावर दोघे भागधारकांचा कौल घेणार आहेत.

नवी दिल्ली - टाटा मोटर्सच्या संचालक मंडळावरून सायरस मिस्त्री आणि स्वतंत्र संचालक नुस्ली वाडिया यांना हटविण्याच्या प्रस्तावावर दोघे भागधारकांचा कौल घेणार आहेत.

टाटा सन्सचे हकालपट्टी करण्यात आलेले अध्यक्ष सायरस मिस्त्री आणि त्यांना पाठिंबा देणारे स्वतंत्र संचालक नुस्ली वाडिया यांना टाटा मोटर्सच्या संचालक मंडळातून हटविण्याचा प्रस्ताव मांडण्यासाठी कंपनीने 22 डिसेंबरला विशेष सर्वसाधारण सभा बोलाविली आहे. या सभेत मिस्त्री आणि वाडिया या प्रस्तावावर मतदान घेणार आहेत. टाटा स्टील आणि टाटा केमिकल्सने काल याबाबत शेअर बाजाराला माहिती दिली. टाटा सन्सचा टाटा मोटर्समध्ये 26.51 टक्के हिस्सा आहे. टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून मिस्त्री यांची 24 ऑक्‍टोबरला हकालपट्टी करण्यात आली होती. तसेच, टाटा स्टीलच्या अध्यक्षपदावरून 25 नोव्हेंबरला त्यांना हटविण्यात आले होते.

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) आणि टाटा ग्लोबल बिव्हरेजेस या कंपन्यांच्या अध्यक्षपदावरून मिस्त्री यांना दूर करण्यात आले आहे. टाटा मोटर्स आणि इंडियन हॉटेल या कंपन्यांतून हटविण्याबत विशेष सर्वसाधारण सभा बोलाविण्यात आल्या आहेत. रतन टाटा आणि सायरस मिस्त्री यांच्यातील वादात नुस्ली वाडिया मिस्त्रींच्या पाठिशी कायम राहिले आहेत. ते समूहातील काही कंपन्यांवर स्वतंत्र संचालक आहेत. मिस्त्री यांच्या अचानक हकालपट्टीने टाटा समूहातील सर्वांत मोठा भागीदार शापूरजी पालनजी समूह आणि टाटा यांच्यात वर्चस्वाची लढाई सुरू आहे.

"मिस्त्री हटाव' मोहिमेला वेग
टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी झाल्यानंतरही मिस्त्री समूहातील काही कंपन्यांचे अध्यक्ष आणि संचालक होते. कंपनीच्या संचालक मंडळातून अध्यक्षाला हटवता येते. मात्र, संचालकाला काढण्यासाठी भागधारकांची मंजुरी आवश्‍यक असते. मिस्त्रींना काढल्यानंतर टाटा सन्सची धुरा रतन टाटा यांच्याकडे आली आहे. त्यामुळे मागील काही काळापासून मिस्त्री यांना सूमहातील कंपन्यांतून हटविण्याची जोरदार मोहीम सुरू आहे.

Web Title: Mistry, Wadia will take call of share holders