esakal | रुपयाचे कोसळणे आणि नेटकरांचे बरसणे... 
sakal

बोलून बातमी शोधा

rupee falls

रुपयात सतत सुरु असलेल्या घसरणीवरून मोदी समर्थकांच्या दुटप्पीपणावर समाजमाध्यमांतून प्रहार करण्यात येत आहे. 

रुपयाचे कोसळणे आणि नेटकरांचे बरसणे... 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची ऐतिहासिक घसरण झाल्यामुळे अर्थव्यवस्थेला मोठा झटका बसला असून, सरकारच्या अर्थनितीविरोधात समाजमाध्यमांतून मोठ्या प्रमाणावर टीकेचे सूर उमटू लागले आहेत. रुपयाच्या किमतीत विक्रमी घट झाल्याचे वृत्त आल्यानंतर संतापलेल्या काही नेटकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह त्यांच्या काही समर्थकांना आज समाजमाध्यमांद्वारे आरसा दाखवित त्यांच्या टीकेतील दुटप्पीपणा उघड केला. 

डॉ. मनमोहनसिंग यांच्या कारकिर्दीत रुपयाची घसरण होताच नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठविली होती. त्यातील एका भाषणाची ध्वनिफीत प्रसारित करून काही ट्‌विटरकरांनी मोदींना त्यांच्या त्या टीकेची आठवण करून दिली. त्या काळात कॉंग्रेसच्या सरकारवर मनमुराद टीका करणाऱ्या, मनमोहनसिंग यांची टवाळी करणाऱ्या काही पत्रकार आणि मोदी समर्थक "पेज थ्री' कलाकार आणि साहित्यिकांनाही आज अनेक नेटकरांनी धारेवर धरले. 

ज्येष्ठ चित्रपट अभिनेते अनुपम खेर यांनी 23 मे 2012 रोजी "लवकरच रुपया ज्येष्ठ नागरिक बनेल' असे ट्‌विट करून मनमोहनसिंग सरकारच्या धोरणांवर तिरकस प्रहार केले होते. मोदींची कट्टर समर्थक असलेल्या एका महिला "अँकर'ने 19 ऑगस्ट 2013 रोजी "ढासळता रुपया हा अर्थशास्त्री पंतप्रधानांवरील कलंक आहे', अशा शब्दांत टीका केली होती. 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी काही जणांनी मोदी सत्तेवर आले तर कसे "अच्छे दिन' येतील हे सांगताना कसलीही कसर सोडली नव्हती. धार्मिक नेते श्री श्री रविशंकर यांनी "मोदी सत्तेवर आले तर डॉलरचा भाव 40 रुपयांवर जाईल हे ऐकणेही मनाला उभारी देणारे आहे' अशा शब्दांत 21 मार्च 2014 रोजी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी तर "वर्ष 2017 : 1 रु. = 1 डॉलर' असे स्वप्न 23 मे 2012 रोजीच दाखविले होते. या सर्वांना त्यांच्या जुन्या विधानांची आठवण करून देतानाच, आज रुपया 72 च्या घरात गेला तरी हे लोक गप्प का, असा सवाल नेटकरांनी केला. तेव्हाच्या सरकारवर टीका करणारे चेतन भगत, अमिताभ बच्चन यांच्यासारखे "सेलेब्रिटी' कसे दुटप्पी आहेत, हेही अनेक नेटकर अहमहमिकेने दाखवून देत होते. 

ज्या प्रकारे डॉलर मजबूत होत चालला आहे, रुपया कमजोर होत चालला आहे. (ते पाहता) जागतिक व्यापारात भारत टीकू शकणार नाही... आणि दिल्लीचे सरकार यावर काहीही उत्तर देत नाही. देश जानना चाहता है, प्रधानमंत्रीजी! 
- नरेंद्र मोदी (गुजरातचे मुख्यमंत्री असताना मनमोहनसिंग यांच्यावर केलेली टीका. तेव्हाच्या एका भाषणातून.) 

loading image
go to top