'आशिया-आफ्रिका कॉरिडॉर’साठी मोदींचा पुढाकार

वृत्तसंस्था
बुधवार, 24 मे 2017

महात्मा गांधी यांनी अहिंसेचे साधन दक्षिण आफ्रिकेतील वास्तव्यात वापरले. भारत आणि आफ्रिका यांच्या शतकांपेक्षा जुने दृढ संबंध आहेत. भारताच्या परकी आणि अर्थिक धोरणांमध्ये आफ्रिका प्राधान्यक्रमावर आहे.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

चीनच्या "ओबोर'च्या पार्श्‍वभूमीवर भारत-जपानचा पाठिंब्यातून प्रकल्प साकारणार

गांधीनगर : जपान आणि भारताच्या पाठिंब्यातून होणाऱ्या आशिया- आफ्रिका विकास कॉरिडॉरसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतला आहे. "वन बेल्ट वन रोड' (ओबोर) हा महत्वकांक्षी प्रकल्प चीनने सुरू केल्याच्या पार्श्‍वभूमीवर मोदींचे हे पाऊल महत्वाचे मानले जात आहे.

आफ्रिकन डेव्हलपमेंट बॅंकेच्या 52व्या वार्षिक सर्वसाधारण बैठक भारतात पहिल्यांदा झाली. या वेळी उद्घाटनपर भाषणात मोदी यांनी आफ्रिकेतील देशांशी संबंध दृढ करण्यावर भर असून, भारतासाठी आफ्रिका खंड प्राधान्यक्रमावर असल्याची भूमिका मांडली. मोदी म्हणाले, ""आफ्रिकेतील विकासाला पाठबळ देण्यासाठी भारत जपानसोबत काम करीत आहे. जपानचे पंतप्रधान शिंझो अबे यांच्यासोबत मी आशिया-आफ्रिका विकास कॉरिडॉरचा प्रस्ताव मांडला होता. यासाठी आफ्रिकेतील देशांशी चर्चा करण्याचेही नियोजन आहे. याबाबत भारत आणि जपानमधील संशोधन संस्थांनी "व्हिजन डॉक्‍युमेंट' तयार केले आहे. ते आफ्रिकेतील थिंकटॅंकशी सल्लामसलत करून बनविण्यात आले आहे. या बैठकीत तो मांडण्यात येईल. भारत आणि जपान यांनी अन्य देशांसोबत कौशल्य विकास, माहिती तंत्रज्ञान, उत्पादन, आरोग्य आणि दूरसंचार या क्षेत्रात एकत्र काम करावे, अशी कल्पना आहे. ''

"आफ्रिकेत मागील 20 वर्षांत सर्वाधिक गुंतवणूक करणाऱ्या देशांमध्ये भारत पाचव्या स्थानी आहे. या काळात भारताने आफ्रिकेत 54 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. मागील 15 वर्षांत भारत -आफ्रिका व्यापार अनेक पटींनी वाढला आहे. मागील पाच वर्षांत तो दुपटीने वाढला असून, 2014-15 मध्ये तो 72 अब्ज डॉलरवर पोचला. लांब पल्ल्याच्या शर्यतीत भारत भारत आफ्रिकेशी स्पर्धा करू शकत नाही. परंतु, भारत कायम आफ्रिकेशी चांगल्या भविष्याच्या शर्यतीत खांद्याला खांदा लावून उभा असेल,'' असे मोदी यांनी सांगितले.

महात्मा गांधी यांनी अहिंसेचे साधन दक्षिण आफ्रिकेतील वास्तव्यात वापरले. भारत आणि आफ्रिका यांच्या शतकांपेक्षा जुने दृढ संबंध आहेत. भारताच्या परकी आणि अर्थिक धोरणांमध्ये आफ्रिका प्राधान्यक्रमावर आहे.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

Web Title: "Modi's initiative for Asia-Africa coridora