मुकेश अंबानी आणि सुनील मित्तल 'झी नेटवर्क'ला ताब्यात घेण्यासाठी आमने सामने...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 एप्रिल 2019

भारतातील आघाडीचे उद्योजक आणि अब्जाधीश मुकेश अंबानी आणि सुनील मित्तल पुन्हा एकदा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. झी नेटवर्क ताब्यात घेण्यासाठी मुकेश अंबानी आणि एअरटेलचे सुनील मित्तल यांच्यात स्पर्धा असल्याचे समोर आले आहे. दोघेही झी टेलिव्हिजन नेटवर्कचे संपादन करण्यासाठी उत्सुक असल्याचे सूत्रांकडून समोर आले आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या (भारत) मोबाईल बाजारपेठेत याआधीच रिलायन्स जिओ आणि एअरटेलमध्ये तीव्र स्पर्धा सुरू आहे. सुनील मित्तल यांच्या एअरटेलने झी एंटरटेनमेंट एंटरप्राईझेस लि. ला ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

भारतातील आघाडीचे उद्योजक आणि अब्जाधीश मुकेश अंबानी आणि सुनील मित्तल पुन्हा एकदा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. झी नेटवर्क ताब्यात घेण्यासाठी मुकेश अंबानी आणि एअरटेलचे सुनील मित्तल यांच्यात स्पर्धा असल्याचे समोर आले आहे. दोघेही झी टेलिव्हिजन नेटवर्कचे संपादन करण्यासाठी उत्सुक असल्याचे सूत्रांकडून समोर आले आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या (भारत) मोबाईल बाजारपेठेत याआधीच रिलायन्स जिओ आणि एअरटेलमध्ये तीव्र स्पर्धा सुरू आहे. सुनील मित्तल यांच्या एअरटेलने झी एंटरटेनमेंट एंटरप्राईझेस लि. ला ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. एअरटेलकडून लवकरच यासंदर्भातील औपचारिक प्रस्ताव दिला जाण्याची शक्यता आहे. त्याचवेळी अंबानींच्या रिलायन्स जिओकडूनसुद्धा झी एंटरटेनमेंटसाठी बोली लावली जाण्याची शक्यता सूत्रांकडून समोर येते आहे.

अर्थातच यासंदर्भातील चर्चा ही प्राथमिक स्वरुपाची असून त्यातून काही व्यवहार घडेलच असे निश्चितपणे समोर आलेले नाही. झी एंटरटेनमेंटच्या प्रतिनिधीने मात्र यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात नकार दिला आहे. रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेलकडून सुद्धा अधिकृतपणे या वृत्ताला दुजोरा देण्यात आलेला नाही. या व्यवहारात बाजी मारणाऱ्याला व्हिडिओ सेवांच्या क्षेत्रात भारतीय बाजारपेठेत चांगलाच महसूल मिळवता येणार आहे. कारण लवकरच भारत सरकार 5 जी स्पेक्ट्रमचा लिलाव करणार आहे. एटी अॅंड टी, व्होडाफोन आणि कडीडीआय सारख्या जगातील आघाडीच्या दूरसंचार कंपन्या फिल्म आणि टेलिव्हिजन, केबल टीव्ही या क्षेत्रातील कंपन्या विकत घेत आहेत. ग्राहकांची संख्या वाढवून महसूल वाढवण्यासाठी ही पावले उचलण्यात येत आहेत. बाजारातील एंटरटेनमेंटच्या क्षेत्रातील कंपन्यांच्या भविष्यातील उपयोगितेमुळे या कंपन्यांनीसुद्धा नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन प्राईम प्रमाणेच इंटरनेटद्वारे आपल्या सेवा पुरवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. झी एंटरटेनमेंट ही सुभाष चंद्र गोयल यांची या क्षेत्रातील महत्त्वाची कंपनी आहे. मात्र सध्या झी एंटरटेनमेंट ही कर्जाच्या विळख्यात सापडली आहे. त्यामुळेच सध्या झी समूह या आर्थिक अडचणीतून बाहेर पडून नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम आणि शेकडो स्थानिक टीव्ही चॅनेलच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी धडपड करतो आहे. यासाठी झी समूहाला एका धोरणात्मक गुंतवणूकदाराची आवश्यकता आहे.

झी एंटरटेनमेंटचे 173 देशांमध्ये, 78 चॅनेल आहेत आणि 130 कोटी प्रेक्षक आहेत. त्यामुळेच झीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी याआधी सोनी कॉर्पोरेशन आणि कॉमकास्ट कॉर्पोरेशन या कंपन्यांनी रस दाखवला होता. मात्र त्यात पुढे कोणतीही प्रगती झाली नाही. झी टेलिव्हिजन नेटवर्कने गोयल यांच्या कुटुंबाच्या मालकीचे निम्मे शेअर विकण्याची तयारी दाखवली आहेत. त्यातील 59 टक्के शेअर हे याआधीच झी समूहाला कर्जपुरवठा करणाऱ्या आणि गुंतवणूकदारांच्या ताब्यात आहेत.

2016 मध्ये रिलायन्स जिओने फ्री कॉल, स्वस्तातील इंटरनेट सुविधा आणल्या होत्या. त्या बळावरच जिओने एअरटेलसारख्या मुख्य स्पर्धकाला पछाडत बाजारपेठेत पहिला क्रमांक पटकावला होता. त्याआधी टेलिकॉम क्षेत्रात एअरटेलच नंबर वन होती. त्यातच व्होडाफोनचे कुमार मंगलम बिर्लांच्या आयडीया सेल्युलरबरोबर विलीनीकरण झाल्यामुळे ती दुसऱ्या क्रमांकाची कंपनी बनली तर एअरटेल तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली आहे.

या स्पर्धेत टिकण्यासाठी एअरटेलने काही नव्या डिजीटल सेवा पुरवण्यास सुरूवात केली आहे मात्र जिओएवढ्या मोठ्या प्रमाणात एअरटेलच्या सेवा पुरवू शकत नसल्याचेच चित्र आहे. जिओच्या भात्यात असंख्य डिजीटल सेवा आहेत. फेब्रुवारी महिन्यात भारती एअरटेलने 320 अब्ज रुपयांचे भांडवल उभारण्याचे उद्दिष्ट जाहीर केले होते. एअरटेलने काही विशेष सुविधांसाठी झी बरोबर करारही केला होता. जानेवारी महिन्यात दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत सुनिल मित्तल यांनी एअरटेलला आपला महसूल वाढवण्यासाठी ग्राहकांना झी, नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन प्राईम यांच्या सेवा पुरवाव्या लागतील असे मत मांडले होते.

Web Title: Mukesh Ambani and Sunil Mittal come forward To get possession of Zee Network