जिओच्या 'आयपीओ'ची वाट बघताय? मग हे वाचा!

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 5 May 2020

जगातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरू असतानासुद्धा मुकेश अंबानी यांच्या जिओ प्लॅटफॉर्म्स लि.ला (जेपीएल) जागतिक गुंतवणूकदारांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. जिओ प्लॅटफॉर्म्स सप्टेंबरपर्यत १.४ लाख कोटी रुपयांची धोरणात्मक गुंतवणूक उभारण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. फेसबुक आणि सिल्व्हर लेक यांनी यात आघाडी घेत गुंतवणूक केली आहे. तर जिओमधील आणखी १० टक्के हिश्यासाठी इतर धोरणात्मक गुंतवणूकदारांशी कंपनीची बोलणी सुरू आहेत.

जगातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरू असतानासुद्धा मुकेश अंबानी यांच्या जिओ प्लॅटफॉर्म्स लि.ला (जेपीएल) जागतिक गुंतवणूकदारांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. जिओ प्लॅटफॉर्म्स सप्टेंबरपर्यत १.४ लाख कोटी रुपयांची धोरणात्मक गुंतवणूक उभारण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. फेसबुक आणि सिल्व्हर लेक यांनी यात आघाडी घेत गुंतवणूक केली आहे. तर जिओमधील आणखी १० टक्के हिश्यासाठी इतर धोरणात्मक गुंतवणूकदारांशी कंपनीची बोलणी सुरू आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या तीन करारांमधूनच कंपनीमध्ये जवळपास ९२,००० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. जिओच्या डिजिटल आणि दूरसंचार व्यासपीठाच्या ऑप्टिकल फायबर इन्व्हेस्टमेंट ट्रस्टमधील हिश्याच्या विक्रीशिवाय जिओची मुख्य प्रवर्तक कंपनी असलेली रिलायन्स इंडस्ट्रीज परकी गुंतवणूकदारांद्वारे २५,००० कोटी रुपयांची गुंतवणूक उभारण्यासाठीची बोलणी करते आहे. याआधी ब्रुकफिल्ड अॅसेट मॅनेजमेंटच्याच उपकंपनीने टॉवर इन्फ्रास्ट्रक्चर ट्र्स्ट मध्ये २५,२१५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. या टॉवर इन्फ्रास्ट्रक्चर ट्रस्टचा रिलायन्स जिओ इन्फ्राटेलमध्ये ५१ टक्के मालकी हिस्सा आहे. 

लॉकडाऊनचे नियम शिथिल होताच पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ

ऑप्टिकल फायबरशी संबंधित करार झाला तर मुकेश अंबानींच्या कंपनीतील गुंतवणूक ५०,००० कोटींवर पोचणार आहे. याआधी रिलायन्सची अबू धाबी इन्व्हेस्टमेंट ऑथोरिटी आणि सिंगापूरच्या जीआयसीबरोबर बोलणी सुरू होती. मात्र व्यावसायिक आणि कामकाजाशी निगडीत अटींवर एकमत न झाल्यामुळे ही बोलणी फिस्कटली होती.

आयटी कर्मचाऱ्यांची भीती,  'पुढील सहा महिन्यात संकट होणार गहिरे'

रिलायन्स इंडस्ट्रीजने रिलायन्स जिओ उभारण्यासाठी जवळपास ४ लाख कोटी रुपये खर्च केले आहेत. फेसबुकशी रिलायन्स जिओचा दोन आठवड्यांपूर्वी मोठा करार झाला आहे. या करारानुसार फेसबुक जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये ४३,५७४ कोटी रुपयांची गुंतवणूक करत जिओचा ९.९९ टक्के मालकी हिस्सा विकत घेणार आहे. जूनपर्यत हा व्यवहार पूर्ण होणार आहे. तर दुसऱ्या एका व्यवहारात सिल्व्हर लेक या कंपनीने जिओमध्ये ५,६५५.७५ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा करार केला आहे. या करारामुळे सिल्व्हर लेकला जिओमधील ४.९० लाख कोटी रुपये इक्विटी मूल्याचा  आणि ५.१५ लाख कोटी व्यावसायिक मूल्याचा १.१५ टक्के मालकी हिस्सा मिळणार आहे.

२०१९-२० या आर्थिक वर्षाचे वित्तीय निकाल जाहीर करताना रिलायन्स इंडस्ट्रीजने फेसबुक-जिओ कराराएवढाच दुसरा मोठा करार होण्याचे सूतोवाच केले होते.

जिओ आणि रिेटेल व्यवसाय यांच्यासाठी आयपीओ पुढील पाच वर्षांच्या आत आणला जाईल असे रिलायन्स सर्वसाधारण वार्षिक सभेत मुकेश अंबानी यांनी सांगितले होते. मात्र हा खूप दीर्घ कालावधी आहे. जिओच्या सध्याच्या ६५ अब्ज डॉलर बाजारमूल्यानुसार जिओ प्लॅटफॉर्म्स २५ टक्के हिश्याच्या माध्यमातून १६ ते १७ अब्ज डॉलरचे भांडवल उभारू शकेल असे बॅंक ऑफ अमेरिका सिक्युरिटिजने आपल्या अलीकडच्या अहवालात म्हटले आहे. आणखी १० टक्के वित्तीय गुंतवणूक आकर्षित केल्यास रिलायन्स इंडस्ट्रीजचे आयपीओद्वारे रोकड उभारण्यावरील अवलंबित्व कमी होईल, असेही या अहवालात म्हटले आहे.

रिलान्यस जिओ ही दूरसंचार कंपनी, जिओ प्लॅटफॉर्म्स लि.चीच उपकंपनी आहे. रिलायन्स जिओ ही देशातील सर्वात मोठ्या दूरसंचार कंपन्यांपैकी एक असून कंपनीच्या ग्राहकांची संख्या फक्त तीन वर्षात ३८ कोटींवर पोचली आहे. कंपनीच्या घोडदौडीच्या दबावामुळे या क्षेत्रातील इतर कंपन्यांना एकतर व्यवसाय गुंडाळावा लागला किंवा इतर कंपन्यांमध्ये विलीनीकरण करावे लागले आहे. मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये सर्व डिजिटल आणि मोबाईल व्यवसायाला एकाच छत्राखाली आणण्यासाठी जिओ प्लॅटफॉर्म्स लि. या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या उपकंपनीची स्थापना करण्यात आली होती.

जेपीएलने २०१९-२० मध्ये ५४,३१६ कोटी रुपयांचा महसूल कमावला आहे. त्याआधी आर्थिक वर्षाच्या तुलनेत कंपनीच्या महसूलात ३३.६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर कंपनीने ५,५६२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे.

थोडक्यात महत्त्वाचे
- 'आयपीओ'शिवाय जिओ उभारणार १.४ लाख कोटी
-फेसबुक-जिओसारखा मोठा करार लवकरच
- आयपीओवर अवलंबून न राहता रोकड उभारण्याचे अंबानींचे प्लॅनिंग
- धोरणात्मक गुंतवणूकीत जिओ उभारणार १.४ लाख कोटी रुपये
- २०१९-२० मध्ये जिओ प्लॅटफॉर्म्सचा महसूल ५४,३१६ कोटी रुपये आणि नफा ५,५६२ कोटी रुपयांवर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mukesh ambani jio ipo information marathi