‘अर्थ’पूर्ण लक्ष्मीपूजन!

मुकुंद लेले
सोमवार, 5 नोव्हेंबर 2018

वर्षभर आतुरतेनं वाट पाहिला जाणारा दिवाळी हा आनंदाचा, प्रकाशाचा, चैतन्याचा सण आजपासून खऱ्या अर्थानं सुरू होतोय. अर्थ-उद्योग-गुंतवणूक जगताच्या दृष्टीनं तर दसरा-दिवाळी हे सण जास्तच महत्त्वाचे! बहुतेक व्यापाऱ्यांच्या वर्षभरात होणाऱ्या एकूण उलाढालीच्या २० टक्के उलाढाल फक्त घटस्थापनेपासून दिवाळीपर्यंतच्या काळात होताना दिसते. दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर कपडे, इलेक्‍ट्रॉनिक वस्तू, वाहनं यांच्या खरेदीनं बाजारपेठा फुलून गेलेल्या दिसतात. अशा खरेदीबरोबरच दिवाळीचा खूप जवळचा संबंध गुंतवणुकीशीदेखील आहे. विशेषत- दिवाळीतल्या धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन या दिवसांचं महत्त्व यादृष्टीनं अधिकच!

वर्षभर आतुरतेनं वाट पाहिला जाणारा दिवाळी हा आनंदाचा, प्रकाशाचा, चैतन्याचा सण आजपासून खऱ्या अर्थानं सुरू होतोय. अर्थ-उद्योग-गुंतवणूक जगताच्या दृष्टीनं तर दसरा-दिवाळी हे सण जास्तच महत्त्वाचे! बहुतेक व्यापाऱ्यांच्या वर्षभरात होणाऱ्या एकूण उलाढालीच्या २० टक्के उलाढाल फक्त घटस्थापनेपासून दिवाळीपर्यंतच्या काळात होताना दिसते. दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर कपडे, इलेक्‍ट्रॉनिक वस्तू, वाहनं यांच्या खरेदीनं बाजारपेठा फुलून गेलेल्या दिसतात. अशा खरेदीबरोबरच दिवाळीचा खूप जवळचा संबंध गुंतवणुकीशीदेखील आहे. विशेषत- दिवाळीतल्या धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन या दिवसांचं महत्त्व यादृष्टीनं अधिकच! लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीची पूजा करून येणारं वर्ष समृद्धीचं, भरभराटीचं जावं, अशी कामना सर्वच जण करतात. या दिवशी शेअर बाजारातही मुहूर्ताचे व्यवहार करण्याची परंपरा आहे. याच परंपरेला धरून थोडं व्यापक, ‘अर्थ’पूर्ण लक्ष्मीपूजन करता येईल का? यानिमित्तानं आपल्या ‘खजिन्या’च्या पेटीची (इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ) तपासणी किंवा चाचपणी होईल, या खजिन्यात नसलेल्या काही मौल्यवान रत्नांना समाविष्ट करण्याचा विचार करता येईल, जेणेकरून आपल्या ‘खजिन्याची पेटी’ भविष्यात अधिकाधिक समृद्ध होत जाईल. हीच बाब लक्षात घेऊन दिवाळीच्या मुहूर्तावर आपल्या ‘खजिन्या’त सोबतची मौल्यवान रत्नं आहेत का, हे तपासून पाहा.

 पुरेसं विमासंरक्षण -
प्रत्येक कमावत्या व्यक्तीकडं पुरेसं आयुर्विमा संरक्षण (टर्म इन्शुरन्स) आणि अपघात विमा संरक्षण. सोबत, कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी पुरेशा प्रमाणात आरोग्यविम्याचं संरक्षण. विम्याच्या भक्कम पायावर गुंतवणुकीचं झाड बहरत जाणं श्रेयस्कर!

  मुदत ठेवी - 
तातडीची आर्थिक गरज भागवण्यासाठी, त्वरित मदतीला येणारी चांगल्या बॅंकेतील मुदत ठेवीची (एफडी) छोटी शिदोरी जवळ असायलाच हवी.  

  पीपीएफ - 
नोकरदार असो वा व्यावसायिक, प्रत्येकाचं ‘पब्लिक प्रॉव्हिडंड फंडा’चं अर्थात ‘पीपीएफ’चं खातं असायलाच हवं. करबचतीबरोबरच करमुक्त व्याजाची ही गंगाजळी निवृत्तीनंतरची तरतूद ठरावी.

  म्युच्युअल फंडात ‘एसआयपी’ -
दीर्घकाळात महागाईच्या दरापेक्षा जास्त परतावा मिळण्याची शक्‍यता असणाऱ्या म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीकडं दुर्लक्ष करता येणार नाही. बाजारातील चढ-उताराचा लाभ मिळण्यासाठी आणि शिस्तबद्ध गुंतवणूक होण्यासाठी ‘सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’ची (एसआयपी) कास धरायलाच हवी. अनुभवी, प्रशिक्षित सल्लागाराच्या मदतीनं योजना निवडून आताच श्रीगणेशा करायला हवा.

  शेअर्स -
अधिक जोखीम घेण्याची क्षमता असणाऱ्यांना थेट चांगल्या कंपन्यांचे शेअर आपल्या खजिन्यात ठेवता येतील. ‘जिथं जोखीम अधिक, तिथं परतावाही अधिक,’ हे सूत्र लक्षात ठेवत असतानाच, या क्षेत्रातल्या जाणकाराच्या सल्ल्यानं पाऊल टाकणं हिताचं!      
  सोनं -
आपल्या खजिन्याला ‘सुवर्णस्पर्श’ झालेला कुणाला नको असतो? ‘कठीण समय येता...’साठी सोन्याचा आधार मोलाचा ठरू शकतो. ‘खजिन्या’चं संतुलन साधण्यासाठी काही प्रमाणात ते असायला हवं. फक्त ते धातूच्या रूपात, की ‘गोल्ड ईटीएफ’च्या रूपात, की ‘सॉव्हरिन बाँड’च्या रूपात, हा ज्याचा-त्याचा प्रश्‍न!

  एनपीएस -
निवृत्तीनंतरच्या तरतुदीसाठी ‘नॅशनल पेन्शन सिस्टिम’सारखा (एनपीएस) काठीरूपी आधार आतापासूनच भक्कमपणे उभारायला हवा. अतिरिक्त करसवलतीबरोबरच भविष्यकाळाची सोय, असा दुहेरी हेतू यातून साध्य होऊ शकतो.

  रिअल इस्टेट -
अन्न, वस्त्र, निवारा आणि ‘खजिन्या’तील मूलभूत गोष्टींची पूर्तता झाल्यानंतर प्लॉट, फ्लॅटसारख्या गुंतवणुकीचा विचार करता येईल. अर्थात, त्यासाठी गुंतवावी लागणारी एकरकमी मोठी रक्कम आणि त्यातून अपेक्षित असणारा परतावा यांचा ताळमेळ बसत असेल तरच!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mukund lele article for laxmipujan