कॅशलेस व्यवहार वाढले

वृत्तसंस्था
सोमवार, 20 नोव्हेंबर 2017

मुंबई - केंद्र सरकारने कॅशलेस अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन दिल्याचे सुपरिणाम डेबिट आणि क्रेडिट कार्डमधून झालेल्या विक्रमी व्यवहारांतून दिसून आले आहेत. सप्टेंबर महिन्यात डेबिट आणि क्रेडिट कार्डमधून तब्बल ७४ हजार ९० कोटींचे व्यवहार झाले आहेत. गतवर्षाच्या तुलनेत यामध्ये ८४ टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. 

मुंबई - केंद्र सरकारने कॅशलेस अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन दिल्याचे सुपरिणाम डेबिट आणि क्रेडिट कार्डमधून झालेल्या विक्रमी व्यवहारांतून दिसून आले आहेत. सप्टेंबर महिन्यात डेबिट आणि क्रेडिट कार्डमधून तब्बल ७४ हजार ९० कोटींचे व्यवहार झाले आहेत. गतवर्षाच्या तुलनेत यामध्ये ८४ टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. 

पॉइंट ऑफ सेल (पीओएस) मशिनमधून होणाऱ्या व्यवहारांमध्ये ८६ टक्‍क्‍यांची वाढ झाली. सप्टेंबरमध्ये पीओएसवर ३७८ दशलक्ष व्यवहार झाले. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये डेबिट आणि क्रेडिट कार्डमधून ४० हजार १३० कोटींचे व्यवहार झाले होते. नोटाबंदीनंतर ग्राहकांनी दैनंदिन व्यवहारांमध्ये कार्डचा मोठ्या प्रमाणात वापर केल्याचे वर्ल्डलाइन या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले आहे. नोटाबंदीने सुरवातीचे काही महिने ग्राहकांनी डिजिटल माध्यमातून आर्थिक व्यवहार केले. त्यानंतर अर्थव्यवस्थेत पुरेशा प्रमाणात रोकड उपलब्ध झाली असली, तरीही कार्डमधील व्यवहार दिवसागणिक वाढत असल्याचे वर्ल्डलाइनच्या दक्षिण आशिया आणि मध्यपूर्व विभागाचे मुख्य कार्यकारी दीपक चंदनानी यांनी सांगितले. 

जनधन योजनेपासून डेबिट आणि क्रेडिट कार्डमधील व्यवहारांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. जनधन योजना लागू झाल्यानंतर डेबिट कार्डमधील व्यवहारांमध्ये ३९ टक्‍क्‍यांची वृद्धी दिसून आली. नोटाबंदीनंतर डेबिट कार्डमधील व्यवहारांमध्ये २२ टक्‍क्‍यांची वाढ झाल्याचे वर्ल्डलाइनने म्हटले आहे. २०१६ ते २०१७ या कालावधीत क्रेडिट कार्डमधील व्यवहारांमध्ये २४ टक्‍क्‍यांची वृद्धी झाली आहे. कार्डमधील वाढते व्यवहार डिजिटल पेमेंट कंपन्यांच्या पथ्यावर पडले आहेत. रिझर्व्ह बॅंकेच्या आकडेवारीनुसार गेल्या नोव्हेंबरपासून सप्टेंबर या दहा महिन्यांच्या कालावधीत डिजिटल व्यवहारांमध्ये सरासरी ३१ टक्‍क्‍यांची वाढ झाली.

कार्डमधून होणाऱ्या व्यवहारांची उलाढाल 
सप्टेंबर २०१७ अखेर 
देशातील एकूण कार्ड : ८ कोटी ५३ लाख 
डेबिट कार्ड : ८ कोटी १९ लाख 
क्रेडिट कार्ड : ३३ लाख ३० हजार 
सप्टेंबर २०१७ मध्ये कार्डमधून झालेले व्यवहार 
७४ हजार ९० कोटी रुपये

Web Title: mumbai news Cashless transactions increased