गुंतवणूकदारांचे 5.8 लाख कोटी पाण्यात 

वृत्तसंस्था
Tuesday, 5 May 2020

देशातील लॉकडाउनच्या कालावधीत वाढ झाल्यामुळे गुंतवणूकदारांच्या चिंतेत भर पडली आहे.सेन्सेक्‍स व निफ्टीमध्ये काल सुमारे6टक्‍क्‍यांपर्यंत घसरण झाल्याने एकाच दिवसात गुंतवणूकदारांना5.8लाख कोटींचा फटका बसला

मुंबई  - अमेरिका आणि चीनमध्ये पुन्हा व्यापार संघर्ष निर्माण झाल्याने जगभरातील प्रमुख देशांच्या बाजारांबरोबरच भारतीय शेअर बाजारात सोमवारी मोठी पडझड झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स तब्बल 2 हजार 2 अंशांनी कोसळून 31 हजार 715 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 566 अंशांनी गडगडून 9 हजार 293 अंशांवर स्थिरावला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोना संसर्गाच्या मुद्‌द्‌यावरून चीन आणि अमेरिका यांच्यात सुरु असलेले वाक्‌युद्ध व्यापारी संघर्षाकडे झुकल्यामुळे जगभरातील शेअर बाजारांमध्ये घसरणीचे वारे आले. देशातील लॉकडाउनच्या कालावधीत वाढ झाल्यामुळे गुंतवणूकदारांच्या चिंतेत भर पडली आहे. यामुळे गुंतवणूकदारांनी समभाग विक्रीवर जोर देऊन नफा वसुलीला प्राधान्य दिले. सेन्सेक्‍स आणि निफ्टीमध्ये काल सुमारे 6 टक्‍क्‍यांपर्यंत घसरण झाल्याने एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 5.8 लाख कोटींचा फटका बसला. 

वाहन क्षेत्रातील कंपन्यांना फटका 
एप्रिल महिन्यात पूर्णपणे लॉकडाउन असल्याने वाहन विक्रीत विक्रमी घट नोंदविली गेली. यामुळे वाहननिर्मिती क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांवर काल विक्रीचा दबाव दिसून आल. क्षेत्रीय पातळीवर औषधनिर्माण कंपन्या वगळता इतर सर्वच क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागात मोठ्या प्रमाणात घसरण झाली. बॅंकिंग, वाहननिर्मिती, वित्तीय सेवा, धातून आणि बांधकाम क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागात तब्बल 7 टक्‍क्‍यांपर्यंत घसरण झाली. 

- कोरोनाशी संबंधित पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एअरटेल, सनफार्मा वधारले 
सेन्सेक्‍सच्या मंचावर एअरटेल आणि सन फार्मा वगळता आघाडीच्या 30 कंपन्यांपैकी 28 कंपन्यांचे समभाग नकारात्मक व्यवहार करीत बंद झाले. आयसीआयसीआय, बजाज फायनान्स, एचडीएफसी, इंड्‌सइंड बॅंक आणि ऍक्‍सिस बॅंकेच्या समभागामध्ये 9 टक्‍क्‍यांपर्यंत घसरण झाली. 

मद्यउत्पादक कंपन्यांचे समभाग तेजीत 
लॉकडाउ 22 मार्चला सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच मद्यविक्री करणारी दुकाने पुन्हा सुरु झाल्याने मद्यउत्पादक कंपन्यांच्या समभागामध्ये सोमवारी मोठी वाढ झाली होती. युनायटेड ब्रेव्हरीज, रॅडिको खेतान, ग्लोबल स्पिरिट्‌स आणि जीएम ब्रेव्हरीज आणि इतर अनेक कंपन्यांचे समभाग मोठ्या प्रमाणात वधारले होते. 

रुपयात मोठी घसरण 
चलन बाजारात काल रुपयाचे डॉलरच्या तुलनेत 58 पैशांनी अवमूल्यन झाले. रुपया 75.71 रुपये प्रतिडॉलर या पातळीवर स्थिरावला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai Stock Exchange Index Sensex