म्युच्युअल फंडात गुंतवणूक का करावी ?

डॉ. दिलीप सातभाई
सोमवार, 2 जुलै 2018

शेअर बाजारामध्ये शास्त्रशुद्ध व जबाबदारीने दीर्घकाळ गुंतवणूक केल्यास गुंतविलेल्या पैशांवर उत्तम परतावा मिळतो, हे सर्वश्रुत आहे. तथापि, सर्वसामान्य व्यक्तींना शेअर बाजाराची व त्यात होणाऱ्या व्यवहारांची, चढ- उतारांची पूर्ण कल्पना नसते. शेअर बाजारात एका दिवसात कोट्यधीश होऊ शकतो, अशा काहीशा अर्धवट संकल्पनेवर काही सर्वसामान्य गुंतवणूकदार शेअर बाजारात गुंतवणूक करीत असतात. अशा आशावादी गुंतवणूकदारांना तज्ज्ञ व्यक्तीच्या सल्ल्यानुसार दिशादर्शक योग्य गुंतवणूक करून शेअर बाजारामधील चढ- उतारांचा फायदा देण्यासाठी म्युच्युअल फंडांच्या विविध योजनांची संकल्पना मांडण्यात आली आहे.

शेअर बाजारामध्ये शास्त्रशुद्ध व जबाबदारीने दीर्घकाळ गुंतवणूक केल्यास गुंतविलेल्या पैशांवर उत्तम परतावा मिळतो, हे सर्वश्रुत आहे. तथापि, सर्वसामान्य व्यक्तींना शेअर बाजाराची व त्यात होणाऱ्या व्यवहारांची, चढ- उतारांची पूर्ण कल्पना नसते. शेअर बाजारात एका दिवसात कोट्यधीश होऊ शकतो, अशा काहीशा अर्धवट संकल्पनेवर काही सर्वसामान्य गुंतवणूकदार शेअर बाजारात गुंतवणूक करीत असतात. अशा आशावादी गुंतवणूकदारांना तज्ज्ञ व्यक्तीच्या सल्ल्यानुसार दिशादर्शक योग्य गुंतवणूक करून शेअर बाजारामधील चढ- उतारांचा फायदा देण्यासाठी म्युच्युअल फंडांच्या विविध योजनांची संकल्पना मांडण्यात आली आहे. आर्थिक ऐपतीनुसार व क्षमतेनुसार गुंतवणूक करणाऱ्यांचादेखील फायदा होतो, हा या गुंतवणुकीचा महत्त्वाचा भाग ठरावा. 

उत्तम परतावा देणारी गुंतवणूक
म्युच्युअल फंडांच्या योजनांचे ढोबळमानाने दोन प्रकार असतात. ज्या वेळी म्युच्युअल फंडाने ६५ टक्‍क्‍यांपेक्षा अधिकची गुंतवणूक शेअर्स या प्रकारामध्ये केलेली असते, त्यांना इक्विटी ओरिएंटेड म्युच्युअल फंड म्हणतात, तर इतर म्युच्युअल फंडास नॉनइक्विटी ओरिएंटेड म्युच्युअल फंड म्हणतात. पहिल्या प्रकारात जोखीम जास्त, तर दुसऱ्या प्रकारात कमी असते व म्हणून परतावाही त्याप्रमाणे जास्त वा कमी असतो. सध्या उपलब्ध असलेल्या गुंतवणुकीच्या प्रकारांपैकी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमयुक्त असली तरी गेली काही वर्षे परंपरागत मुदत ठेवींच्या गुंतवणुकीवर मिळणाऱ्या परताव्याच्या मानाने उत्तम परतावा देणारी ठरलेली आहे, हे निर्विवाद सत्य आहे. 

म्युच्युअल फंडातील सर्वसामान्य व्यक्तींचा सहभाग वाढावा म्हणून कलम ८० सी अंतर्गत सवलत देणाऱ्या इक्विटी लिंक्‍ड सेव्हिंग्ज स्कीम (ईएलएसएस) योजना उपलब्ध असतात. या योजनेत होणारी गुंतवणूक दीड लाख रुपयांपर्यंत उत्पन्नातून वजावट होण्यासाठी पात्र आहे. मुदत ठेवींवर मिळणारे व्याज करदाता ज्या प्राप्तिकर उत्पन्नाच्या कर देयतेच्या गटवारीत असेल, त्यानुसार त्याला प्राप्तिकर भरावा लागतो. परंतु म्युच्युअल फंडावरील लाभांशास हा नियम लागू होत नाही. कारण हा लाभांश पूर्णतः करमुक्त आहे, ही जमेची बाजू. याखेरीज मूळ मुद्दलाची देखील वाढ होऊ शकते, हा वाढीव फायदा. 

अर्थव्यवस्था गतिमान राहण्यासाठी तीन टक्‍क्‍यांपर्यंत भाववाढ असणे सुदृढतेचे लक्षण मानले जाते. परंतु, भाववाढीमुळे चलनाची क्रयशक्ती कमी होते, हा अर्थशास्त्रीय सिद्धांत आहे. म्हणून ती भरून काढण्यासाठी या भांडवलवृद्धीचा फायदा होतो, हे लक्षात घेतले पाहिजे. या खेरीज भांडवलवृद्धी पैशात रूपांतरित केल्यास होणारा अल्पकालीन भांडवली नफा पंधरा टक्के दराने किंवा एका आर्थिक वर्षात एक लाख रुपयांवरील दीर्घकालीन भांडवली नफा दहा टक्के दरने करपात्र होतो. याचा अर्थ यातील एक लाख रुपयांचा दीर्घकालीन भांडवली नफा आजही करमुक्त आहे, हे बऱ्याच गुंतवणूकदारांच्या ध्यानात येत नाही. 

‘एसआयपी’ गुंतवणूक फायदेशीर
तज्ज्ञांच्या मते, किमान पाच- सहा वर्षांचा कालावधी डोळ्यांसमोर ठेवून गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळू शकतो, असा अनुभव आहे. केवळ एक- दोन वर्षांसाठी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करावयाची असल्यास प्रथम जोखीम लक्षात घ्यावी. म्युच्युअल फंडात एकरकमी, तसेच दरमहा टप्प्याटप्प्याने (एसआयपी) गुंतवणूक करता येते. बाजारातील चढ-उतारांचा लाभ घेत, दीर्घकाळात ‘एसआयपी’द्वारे गुंतवणूक करणे फायदेशीर ठरते. महागाईदरापेक्षा अधिक परतावा देण्याची क्षमता असणाऱ्या म्युच्युअल फंडांच्या योजनेत तज्ज्ञ सल्लागारांच्या मदतीने गुंतवणूक करणे हिताचे ठरते. 

(डिस्क्‍लेमर - म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बाजाराच्या जोखमीच्या अधीन असते, त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी योजनेचे माहितीपत्रक काळजीपूर्वक वाचावे.)

काय आहेत फायदे?
    दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणे फायदेशीर
    महागाईदरापेक्षा अधिक परतावा देण्याची क्षमता
    बाजारातील चढ-उतारांचा लाभ घेण्यासाठी ‘एसआयपी’ उपयुक्त
    उद्दिष्टपूर्तीसाठी गुंतवणुकीचे उत्तम साधन
    तरलता, पारदर्शकता या वैशिष्ट्यांमुळे चांगली गुंतवणूक  

Web Title: mutual fund investment