नवीन नोटांचे डिझाईन भारतातच: शक्तिकांत दास

वृत्तसंस्था
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

काळा पैसाधारकांच्या विरोधात अर्थ मंत्रालयाने कडक भूमिका घेतली आहे. करचुकवेगिरी आणि काळा पैसा पांढरा करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
 

नवी दिल्ली: भारतात प्रथमच नवीन नोटांचे डिझाईन करण्यात आले आहे. पाचशे रुपयांच्या नोटांची छपाई वाढवण्यात आली असून, लवकरच सुट्ट्या पैशांची समस्या सुटेल, असे आर्थिक कामकाज सचिव शक्तिकांत दास यांनी आज (गुरुवार) पत्रकार परिषदेत सांगितले.

दास यांनी सांगितले, की 30 डिसेंबरपर्यंत 50 टक्के चलन बाजारात उपलब्ध असेल. नोटा छपाईचा वेगही वाढवण्यात आला असून, 2 ते 3 आठवड्यात परिस्थिती सामान्य होईल. 8 नोव्हेंबरपर्यंत 100 रुपयांच्या 1 लाख 60 हजारांच्या नोटा बाजारात आणल्या आहेत. तसेच त्यानंतर 80 हजार कोटींच्या नव्या नोटांची छपाई करण्यात आली आहे.

नोटाबंदीच्या निर्णयानंतर सरकारच्या कडक बंदोबस्तामुळे बेकायदेशीररित्या जमवण्यात आलेल्या नवीन नोटांचा साठा जप्त करण्यात आला आहे. मात्र जप्त करण्यात आलेल्या नोटा पुन्हा बाजारात चलनात आणल्या जात आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा चलन तुटवडा होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. याशिवाय सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी बाजारातील चलनाचा पुरवठा वाढवला आहे, असे दास यांनी सांगितले.

काळा पैसाधारकांच्या विरोधात अर्थ मंत्रालयाने कडक भूमिका घेतली आहे. करचुकवेगिरी आणि काळा पैसा पांढरा करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
 

Web Title: New notes can’t be counterfeited, says DEA Secretary Shaktikanta Das