शेअर बाजार सावरला; सेन्सेक्‍स, निफ्टीत वाढ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 83 अंशांनी वधारून 36 हजार 563 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 31 अंशांची वाढ होऊन 10 हजार 840 अंशांवर बंद झाला.

मुंबई ः खनिज तेलाच्या भावातील घट आणि डॉलरच्या तुलनेत वधारलेला रुपया यामुळे शेअर बाजारातील घसरणीचे वारे बुधवारी अखेर थांबले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 83 अंशांनी वधारून 36 हजार 563 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 31 अंशांची वाढ होऊन 10 हजार 840 अंशांवर बंद झाला.

मागील दोन सत्रांत शेअर बाजारात घसरणीचे वातावरण होते. सेन्सेक्‍स आणि निफ्टीमध्ये मागील दोन सत्रांत दोन टक्‍क्‍यांहून अधिक घसरण झाली होती. जागतिक पातळीवर आज खनिज तेलाच्या भावात झालेली घट आणि डॉलरच्या तुलनेत वधारलेला रुपया यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साह निर्माण झाला. सौदी अरेबियाच्या ऊर्जामंत्र्यांनी या महिन्याच्या अखेरीस तेलपुरवठा सुरळीत होईल, असा विश्‍वास व्यक्त केला आहे. याचबरोबर अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्धावर तोडगा निघण्याचे सूतोवाच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केल्याने शेअर बाजाराला बळ मिळाले.

ऊर्जा, धातू आणि वीजनिर्मिती क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागात आज मोठी वाढ नोंदविण्यात आली. सेन्सेक्‍सच्या मंचावर आज टाटा स्टील, वेदांता, एसबीआय, टेक महिंद्रा, बजाज फायनान्स, एशियन पेंट्‌स, एम अँड एम, एनटीपीसी आणि पॉवर ग्रीड यांच्या समभागात 3.95 टक्‍क्‍यांपर्यंत वाढ झाली. याचवेळी ओएनजीसी, येस बॅंक, भारती एअरटेल, एचडीएफसी बॅंक, सन फार्मा आणि मारुती यांच्या समभागात 2.08 टक्‍क्‍यांपर्यंत घसरण झाली.

जागतिक पातळीवर संमिश्र वातावरण
आशियातील शांघाय कम्पोझिट, हॅंगसेंग, निक्केई आणि कोस्पी या निर्देशांकांमध्ये आज संमिश्र वातावरण दिसून आले. युरोपातील शेअर बाजारांमध्ये आजच्या सत्राच्या सुरवातीला सकारात्मक वातावरण होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nifty ends below 10840 Sensex up 83 pts