
Adani Group News : निर्मला सीतारामन यांचे अदानी-हिंडेनबर्ग वादावर सूचक वक्तव्य; म्हणाल्या, देशाच्या...
Nirmala Sitharaman On Adani : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अदानी समूहाबाबत हिंडेनबर्ग संशोधन वादावर म्हटले की, देशाच्या नियामकांना खूप अनुभव आहे आणि ते या प्रकरणाकडे लक्ष देत आहेत. आरबीआय बोर्डाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना अर्थमंत्र्यांनी हे वक्तव्य केलं.
अदानी समूहावरील हिंडेनबर्ग संशोधन अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर, अदानी समूहाच्या समभागातील अस्थिरतेबद्दल सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केल्यानंतर अर्थमंत्र्यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला.
याला उत्तर देताना अर्थमंत्र्यांनी सांगितले की, भारताचे नियामक खूप अनुभवी आहेत आणि सर्व आपापल्या क्षेत्रातील तज्ञ आहेत. इतकंच नाही तर ते नेहमी सतर्क असतात.
शुक्रवारी, 10 फेब्रुवारी 2023 रोजी, अदानी समूहाच्या प्रकरणासंदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना, सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि शेअर बाजार नियामक सेबीकडून सोमवारपर्यंत उत्तरे मागितली आहेत.
शॉर्ट सेलर हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या शेअर्समधील प्रचंड अस्थिरतेमुळे उद्भवलेल्या परिस्थितीपासून लहान गुंतवणूकदारांचे संरक्षण करण्यासाठी कोणती पावले उचलण्याची गरज आहे, अशी विचारणा न्यायालयाने सरकार आणि सेबीला केली.
परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील समिती स्थापन करता येईल का, अशी विचारणा न्यायालयाने केली.
न्यायालयाच्या या प्रश्नावर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले की, हे प्रकरण सेबीच्या निदर्शनास आहे आणि ते त्यावर लक्ष देत आहेत.
हेही वाचा : वेळ सिमेंट आणि बँकांच्या शेअरमध्ये अभ्यासपूर्ण गुंतवणूक करण्याची
मात्र, सोमवार, 13 फेब्रुवारी 2023 रोजी सविस्तर प्रतिक्रियेसह संपूर्ण प्रकरण न्यायालयाला सांगू, असे त्यांनी न्यायालयाला सांगितले. खरे तर सरन्यायाधीश डी.वाय चंद्रचूड, न्यायमूर्ती पी. एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती जे.बी.पार्डीवाला यांनी न्यायालयाकडून चिंता व्यक्त केली.