नियोजन आयोग बरखास्त करण्याची घोडचूक भोवणार : मुणगेकर 

विजय गायकवाड 
बुधवार, 18 एप्रिल 2018

मुंबई : 'येत्या पाच वर्षांमध्ये देशांतर्गत आणि जागतिक पातळीवरील अपेक्षित मोठ्या आर्थिक स्थित्यंतरामुळे कोणताही जागतिक तज्ज्ञ आर्थिक विकासदराचे भाकीत करणार नाही. पण निती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार यांचे नऊ टक्के विकासदराचे भाकीत हे राजकीय नेत्याला शोभणारे आहे. केंद्र सरकारने नियोजन आयोग बरखास्त करून त्याऐवजी निती आयोगासारखी कामचलाऊ संस्था निर्माण केली आहे. ही मोठी घोडचूक आहे. त्याची देशाला किंमत मोजावी लागेल', अशी टीका नियोजन आयोगाचे माजी सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी 'सकाळ'शी बोलताना केली. 

'भारतीय समाजाचे सामाजिक आर्थिक पैलू' या विषयावरील ग्रंथाचे प्रकाशन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते पार पडले होते. त्यावेळी डॉ. कुमार यांनी 'देशाचा विकासदर वाढून नऊ टक्‍क्‍यांवर स्थिरावेल' असा दावा केला होता. 

याविषयी डॉ. मुणगेकर म्हणाले, "2022 उजाडायला अजून पाच वर्षे आहेत. या कालावधीत भारतीय आणि जागतिक अर्थव्यवस्थेत काय स्थित्यंतरे होतील, हे भाकीत कोणत्याही जागतिक तज्ज्ञाला करता येणार नाही. सध्याच्या अनिश्‍चित वातावरणात आर्थिक विकासाचा दर इतका जाईल, असे म्हणायला कोणताही आधार नाही. येत्या एक-दोन वर्षांत काय होईल, हे सांगणे उचित आणि व्यवहार्य ठरेल.'' 

'गेल्या तीन वर्षांत देशाच्या विकासाची चक्रे उलट्या दिशेने फिरत आहेत' असा दावाही डॉ. मुणगेकर यांनी केला. 'विकासदर 5.5 ते 6.5 टक्के इतकाच मर्यादित राहिला आहे', असेही त्यांनी सांगितले. 'गेल्या वर्षी शेतीचे उत्पादन वाढल्याने यंदा विकासदर 7 ते 7.5 टक्‍क्‍यांपर्यंत जाऊ शकेल; पण आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती प्रति बॅरल 75 डॉलरपर्यंत गेल्या आहेत. पश्‍चिम आशियातील राजकीय अस्थिरता लक्षात घेता या किंमती आणखी वाढू शकतात. पेट्रोल-डिझेलच्या किंमती आताच भरमसाठ वाढल्या आहेत. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमती आणखी वाढल्या, तर देशांतर्गत किंमती वाढून विकासदरावर प्रतिकूल परिणाम होईल. महागाई वाढेल, आयात-निर्यातील तूट वाढेल आणि एकूणच अर्थव्यवस्थेत प्रतिकूल परिस्थिती निर्माण होईल', अशी भीती त्यांनी व्यक्त केली. 

या सर्व पार्श्‍वभूमीवर 'डॉ. कुमार यांच्या नियोजनात रोजगारनिर्मितीविषयी कुठलाही उल्लेख दिसत नाही, याचे आश्‍चर्य वाटते' असेही डॉ. मुणगेकर म्हणाले.

Web Title: NITI Aayog is the biggest mistake of Modi Government says Bhalchandra Mungekar