'ती’ लाखात देखणी; पण का नाकारली?

'ती’ लाखात देखणी; पण का नाकारली?

मुंबई: जगभरात निर्मितीपूर्वीच प्रसिद्धीच्या झोतात आलेली कार म्हणजे नॅनो... ‘टाटा मोटर्स’सारख्या प्रसिद्ध कंपनीने या कारची निर्मिती केली. सर्वसामान्य कुटुंबाला पडणारे कारचे स्वप्न परवडणाऱ्या किमतीत कार देऊन पूर्ण करावे, हा त्यामागचा हेतू होता. म्हणूनच नॅनो ही जगातील सर्वात स्वस्त कार म्हणून पुढे आली; परंतु या कारला ग्राहकांकडून प्रतिसादच मिळाला नसल्याने ती रस्त्यावर पाहिजे त्या प्रमाणात धावलीच नाही. मोठ्या प्रसिद्धीनंतरही नॅनोला अपयश का आले याविषयी...

ज गात कार बनवणाऱ्या अनेक कंपन्यांपैकी प्रसिद्ध आणि विश्‍वासार्ह टाटा कंपनीने सर्वसामान्य आणि लहान कुटुंबासाठी सर्वात स्वस्त कारनिर्मितीचे स्वप्न पाहिले होते. टाटा कंपनीने फक्‍त एक लाख रुपयांत नॅनो कार उपलब्ध करून दिली होती. या कारची निर्मिती होण्यापूर्वी जगभरातील स्पर्धक कंपन्यांनी एक लाखात कार बनवणे शक्‍य नसल्याचे म्हटले होते. तरी आपल्या अभियंत्यांची बुद्धिमत्ता पणाला लावून टाटाने नॅनोला सर्वात स्वस्त कार म्हणून बाजारात आणली. 

ही कार ४ सदस्यीय कुटुंबांना नजरेसमोर ठेवून बनवण्यात आली होती. नॅनो बाजारात येण्यापूर्वी जगभरात कारची मोठ्या प्रमाणात जाहिरात झाली. ही जाहिरात कंपनीने नाही, तर लोकांनीच केली. कारण जगातील सर्वात स्वस्त कार अशी चर्चा लोकांमध्ये होती. एका आयफोन मोबाईलपेक्षा थोड्या जास्त किमतीत कार मिळत असल्याने या कारकडे बाजाराचे लक्ष वेधले गेले. चक्क अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीही नॅनोचे कौतुक केले. नॅनोच्या पहिल्या कारच्या निर्मितीपूर्वीच ग्राहकांकडून जादा बुकिंग झाली. 

नॅनोची सुरुवात धमकेदार होती; परंतु आजच्या घडीला नॅनोला बाजारातील आपले स्थान टिकवून ठेवण्यात अपयश आहे. नॅनोची गुणवत्ता चांगली होती, किंमत कमी होती, सोशल मीडियावर लोकांनी स्वत:हूनच नॅनोविषयी चर्चा करून जाहिरात घडवून आणली. तरीही नॅनो अपयशी का झाली? नॅनोची मार्केटिंग ठरलेल्या पद्धतीने होत नव्हती, तर ती आपोआप होत होती. ती कंपनीच्या नियंत्रणातदेखील राहिली नाही. त्यामुळे जगातील सर्वात ‘स्वस्त’ कार हीच टॅगलाईन नॅनोच्या अपयशाचे कारण बनली. 

स्वस्त म्हणजे गुणवत्तेशी तडजोड असणारे, असे समीकरण नॅनोच्या बाबतीत जोडले गेले. त्यामुळे नॅनोच्या विश्‍वासार्हतेतही घट होऊ लागली. स्वस्त कार ही टॅगलाईन नॅनोची मार्केटिंग टीम सकारात्मकपणे प्रसिद्ध करण्यास कमी पडली. खरे तर टाटा कंपनीचे कौतुक करायला हवे, की त्यांनी फक्त एक लाखात कार बाजारात आणली; परंतु स्वस्त असल्याने गुणवत्तेशी तडजोड केली गेली असावी. त्यामुळे ती सुरक्षितही नसावी, असा नकारात्मक संदेश ग्राहकांमध्ये गेला.

टाटा कंपनीने भारतातील घराघरात आणि गावागावात नॅनो असावी, असा उद्देश ठेवला होता. भारतातील निमशहरी भागात रस्त्यांची दुर्दशा कायमच पाहायला मिळते. त्यामुळे या रस्त्यांवर नॅनो कितपत तग धरू शकेल याविषयी ग्राहकांमध्ये साशंकता होती. तसेच बहुतांशी निमशहरी कुटुंबांची सदस्यसंख्या चारपेक्षा जास्त आहे. नॅनो त्याबाबतीत कमी पडली. त्यात तयार झालेल्या लाखो गाड्यांपैकी २-३ गाड्यांना आग लागल्याची घटना घडली. यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात नकारात्मक संदेश गेला. या घटनांनाही योग्य दिशा देत ग्राहकांची विश्‍वासार्हता कायम ठेवण्यात नॅनोची मार्केटिंग टीम कमी पडली. जे प्रतिस्पर्धी एक लाखात गाडी बनवणे शक्‍य नाही, असे म्हणत होते, त्यांच्या हाती यामुळे आयते कोलित आले. त्यामुळे नॅनोची आपोआप होणारी सकारात्मक प्रसिद्धी नकारात्मकतेकडे वळली. आपण स्वस्त गाडीचे मालक म्हणून ओळख नको, या ग्राहकांच्या चुकीच्या आणि नकारात्मक मानसिकतेमुळे नॅनो बाजारात मागे पडली. खरे तर आजही टाटांच्या निर्मितीवर विश्‍वास ठेवून अनेक जण नॅनो वापरत आहेत, हे महत्त्वाचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com