लघु-मध्यम उद्योगांना नोटाबंदीचा फटका

वृत्तसंस्था
सोमवार, 23 जानेवारी 2017

अर्थव्यवस्था अनिश्‍चिततेच्या भोवऱ्यात असून, सध्या नेमकी परिस्थिती काय आहे, हे सांगणे अवघड आहे. आमच्या सर्वेक्षणात काही प्रमाणात व्यवस्थेवर ताण आल्याचे दिसते; मात्र आत्ताच नोटाबंदी अर्थव्यवस्थेसाठी चांगली अथवा वाईट ठरविणे शक्‍य नाही.
- डी. एस. रावत, सरचिटणीस, असोचेम

कोलकता : नोटाबंदीचा फटका लघु व मध्यम उद्योगांना बसला असून, ग्रामीण भागातील मागणी कमी होण्यासोबत रोजगारनिर्मितीतही घट झाली आहे. याच वेळी मोठ्या उद्योगांना नोटाबंदीचा दीर्घकालीन फायदा होणार आहे, असा निष्कर्ष असोचेम-बिझकॉनच्या सर्वेक्षणात समोर आला आहे.

या सर्वेक्षणात परस्परविरोधी निष्कर्ष निघाले आहेत. लघु व मध्यम उद्योगांना फटका बसला असून, त्यांना सावरण्यास आणखी एक तिमाही लागेल, असे मत सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आले आहे. याच वेळी नोटाबंदीचा मोठ्या कंपन्यांना दीर्घकालीन फायदा होईल, असे मतही व्यक्त झाले आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या व्यक्तींपैकी बहुतांश जणांना चालू आर्थिक वर्षात विक्री कमी होईल, असे वाटत आहे.

नोटाबंदीमुळे निर्माण झालेल्या रोकडटंचाईने भाज्या आणि काही धान्यांचे भाव घसरले आहेत. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 92 टक्के जणांना नोटाबंदीमुळे चलनवाढ कमी होईल, असे वाटते; मात्र याच वेळी 66 टक्के जणांना नोटाबंदीमुळे गुंतवणूक, ग्राहक आत्मविश्‍वास आणि मागणी यावर नकारात्मक परिणाम होईल, असे वाटत आहे. विशेषत: ग्रामीण भागात मागणी कमी होईल, असे अनेक जणांचे मत आहे.

Web Title: note ban affected small medium scale industry