वाहनविक्रीवर नोटाबंदीची संक्रांत

वाहनविक्रीवर नोटाबंदीची संक्रांत

नवी दिल्ली : देशातील वाहन उद्योगावर नोटाबंदीमुळे संक्रांत आली असून, वाहनांची विक्री नोटाबंदीमुळे डिसेंबरमध्ये 18.66 टक्‍क्‍यांनी घसरली आहे. मागील 16 वर्षांतील ही सर्वांत मोठी घसरण ठरली आहे.

"सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्‍चरर्स'ने (एसआयएएम) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, स्कूटर, दुचाकी आणि मोटारींची विक्री डिसेंबरमध्ये नीचांकी पातळीवर आली आहे. पाचशे व हजारच्या नोटा नोव्हेंबरमध्ये बंद करण्यात आल्याने वाहननिर्मिती क्षेत्राला मोठ्या प्रमाणात फटका बसला. सर्व प्रकारच्या वाहनांच्या विक्रीमध्ये (डिसेंबर) 18.66 टक्के घसरण झाली. गेल्या महिन्यात 12 लाख 21 हजार 929 वाहनांची विक्री झाली. डिसेंबर 2015 मध्ये ही विक्री 15 लाख 2 हजार 314 होती.

एसआयएमचे महासंचालक विष्णू माथूर म्हणाले, ""सर्व प्रकारच्या वाहनांच्या विक्रीत डिसेंबर 2000 नंतर झालेली ही सर्वांत मोठी घसरण आहे. त्या वेळी विक्रीत 21.81 टक्के घसरण झाली होती. नोटाबंदीमुळे ग्राहकांमध्ये नकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचा फटका मोठ्या प्रमाणात बसला. हलक्‍या व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत मात्र, डिसेंबरमध्ये 1.15 टक्के वाढ झाली असून, ही विक्री 31 हजार 178 आहे. देशात मोटारींची विक्री गेल्या महिन्यात 1 लाख 58 हजार 617 होती. डिसेंबरमध्ये 2015 मध्ये 1 लाख 72 हजार 671 मोटारींची विक्री झाली होती. मोटारींच्या विक्रीत एप्रिल 2014 पासून पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. प्रवासी वाहनांच्या विक्रीत मागील महिन्यात 1.36 टक्के घसरण होऊन ती 2 लाख 27 हजार 824 वर आली. डिसेंबर 2015 मध्ये 2 लाख 30 हजार 959 मोटरींची विक्री झाली होती. प्रवासी वाहनांच्या विक्रीत याआधी ऑक्‍टोबर 2014 मध्ये 7.9 टक्के घसरण झाली होती.''

सर्वच दुचाकींच्या विक्रीत डिसेंबरमध्ये 22.04 टक्के घसरण झाली असून, 1997 नंतरची ही सर्वांत मोठी घसरण आहे. गेल्या महिन्यात 9 लाख 10 हजार 235 दुचाकींची विक्री झाली, तर डिसेंबर 2015 मध्ये 11 लाख 67 हजार 621 दुचाकींची विक्री झाली होती. दुचाकींची बाजारपेठ ही अर्ध्यापेक्षा अधिक ग्रामीण भागात आहे. नोटाबंदीचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागाला बसल्याने दुचाकींची विक्रीही कमी झाली आहे, असे माथूर यांनी सांगितले.

वाहनांच्या विक्रीत झालेली ही घसरण तात्पुरती असून, अर्थसंकल्पामध्ये कशा प्रकारच्या उपाययोजना होतात यावर विक्रीत होणारी वाढ अवलंबून असेल. संपूर्ण अर्थव्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी अर्थसंकल्पात पावले उचलल्यास ग्राहकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होईल.
- विष्णू माथूर, महासंचालक, एसआयएएम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com