कच्च्या तेलाचे उत्पादन घटू लागले

वृत्तसंस्था
शुक्रवार, 20 जानेवारी 2017

आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेची माहिती; "ओपेक'च्या कराराचा परिणाम

पॅरिस: आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव स्थिर ठेवण्यासाठी तेल उत्पादक देशांची संघटना "ओपेक'मधील सदस्य देशांकडून या महिन्यात कच्च्या तेलाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी होईल, अशी माहिती आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेने (आयईए) गुरुवारी दिली.

आयईएने दिलेल्या माहितीनुसार, "ओपेक'मधील सदस्य देश करारानुसार जानेवारी महिन्यात मोठ्या प्रमाणात तेलाच्या उत्पादनात कपात करतील, अशी चिन्हे आहेत. "ओपेक'ने 30 नोव्हेंबरला केलेल्या ऐतिहासिक करारानुसार, जागतिक पातळीवर तेलाचे भाव स्थिर ठेवण्यासाठी कपात करण्यास सर्व देशांनी सहमती दर्शविली आहे. तेल निर्यातदार देशांच्या संघटनेनेही 1 जानेवारीपासून तेलाचे उत्पादन प्रति दिन 12 लाख बॅरलने कमी करून 3.25 कोटी बॅरलवर आणण्याचा निर्णय घेतला आहे. डिसेंबर महिन्यात तेलाचे उत्पादन कमी झाले असले तरी ते "ओपेक'च्या करारापेक्षा अधिक आहे. सौदी अरेबिया आणि अन्य देश या महिन्यात कपात करीत असल्याने मोठ्या प्रमाणात तेलाच्या उत्पादन कमी होणार आहे.
गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात तेलाचे उत्पादन होऊन मागणीपेक्षा अधिक तेल बाजारात आल्याने जागतिक पातळीवर तेलाचे भाव नीचांकी पातळीवर आले होते. मात्र, "ओपेक'च्या करारानंतर या परिस्थितीत सुधारणा होत आहे. अतिरिक्त उत्पादन कमी झाल्याने अतिरिक्त पुरवठाही कमी झाला आहे. "ओपेक' सदस्य देश व इतर देश योग्य समन्वय साधून उत्पादनात कपात करीत आहेत. पुढील काही आठवड्यांत याबाबत स्पष्टता निर्माण होईल, असे आयईएने म्हटले आहे.

जागतिक पातळीवर 2016 मध्ये तेलाची मागणी प्रति दिन 1.5 दशलक्ष बॅरलने वाढली होती. 2017 मध्ये तेलाची मागणी कमी होऊन ती प्रति दिन 1.3 दशलक्ष बॅरलने कमी होण्याचा अंदाज आहे. तसेच, उत्पादनाचा वाढता खर्च आणि अमेरिकी डॉलर वधारत असल्याने यावर्षी तेलाचे भाव वाढतील.
- आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्था

Web Title: oil production Decreases