बाद नोटांची बॅंकांना डोकेदुखी

old note
old note

रिझर्व्ह बॅंकेकडून निर्देश न आल्याने स्थिती

पुणे: पाचशे आणि हजार रुपयांच्या बाद झालेल्या नोटांबाबत रिझर्व्ह बॅंकेकडून कोणतेही निर्देश न आल्याने देशभरातील बॅंकांना या चलनाची डोकेदुखी होऊन बसली आहे. केंद्र सरकारच्या अर्थ खात्याची संसदीय समिती आणि रिझर्व्ह बॅंक यांच्यातील वादात हे निर्देश अडकले आहेत. या नोटा ठेवायच्या कुठे? असा प्रश्‍न राष्ट्रीयीकृत आणि खासगी बॅंकांपुढे उभा राहिला आहे. एकट्या पुणे शहरातील राष्ट्रीयीकृत आणि खासगी बॅंकांमध्ये सुमारे वीस ते पंचवीस हजार कोटी रुपयांच्या बाद झालेल्या नोटा पडून असल्याची माहिती समोर आली आहे.

केंद्र सरकारने आठ नोव्हेंबर रोजी चलनातून पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बाद करण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबरच 31 डिसेंबर 2016 पर्यंत या सर्व नोटा बॅंकेत जमा करण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. त्यानुसार नागरिकांनी या नोटा बॅंकेत भरल्या. त्यानंतर या नोटा रिझर्व्ह बॅंकेकडून जमा करून घेणे अपेक्षित होते. रिझर्व्ह बॅंकेने जमा झालेल्या नोटांचा तपशील बॅंकांकडून मागवून घेतला; मात्र या नोटा जमाच करून घेतल्या नाहीत. नोटाबंदीचा निर्णय होऊन सात महिने उलटले, तरी या नोटांबाबत रिझर्व्ह बॅंकेकडून कोणत्याही स्पष्ट सूचना या बॅंकांना मिळालेल्या नाहीत. अखेर या नोटा ताब्यात घेण्यात याव्यात, असे ई-मेलही बॅंकांकडून रिझर्व्ह बॅंकेला वारंवार पाठविण्यात आले. तरीही रिझर्व्ह बॅंकेकडून नोटा ताब्यात घेण्यासाठी कोणतीही हालचाल झालेली नाही, असे बॅंकांच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

यासंदर्भात अधिक माहिती घेतली असता, नोटाबंदीनंतर किती नोटा जमा झाल्या, यावरून संसदीय समिती आणि रिझर्व्ह बॅंक यांच्यात वाद सुरू आहे. त्यामुळेच रिझर्व्ह बॅंकेकडून याबाबत कोणतेही निर्देश देण्यात आले नाहीत.

पहिल्या टप्प्यात रिझर्व्ह बॅंकेकडून बाद झालेल्या नोटा जमा करून घेण्यात आल्या; मात्र त्यांची संख्या मोठी असल्यामुळे रिझर्व्ह बॅंकेच्या मुंबईतील वाशी
आणि सीबीडी बेलापूर येथील जुन्या टांकसाळीची जागा पूर्णपणे भरली आहे. नव्या नोटा जमा करण्यासाठीची जागा रिझर्व्ह बॅंकेकडेदेखील उपलब्ध नाही. त्यामुळेच रिझर्व्ह बॅंकेकडून बाद झालेल्या नोटा जमा करून घेतल्या जात नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

बाद नोटांनीच करन्सी चेस्ट भरली असल्यामुळे दर आठ-पंधरा दिवसांनी येणारी नव्या चलनातील रोकड कशी आणि कुठे ठेवायची, याचे व्यवस्थापन कसे करायचे, असे प्रश्‍न बॅंकांसमोर उभे राहू लागले आहेत. पुण्यात 27 राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या आणि वीस खासगी बॅंकांच्या शाखा आहेत. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या संदर्भात बॅंकांची बैठक झाली होती. त्यात पुढील आठवड्यात रिझर्व्ह बॅंकेकडून याबाबतचे निर्देश येतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती; मात्र अद्यापही रिझर्व्ह बॅंकेकडून यासंदर्भात निर्देश आलेले नाहीत. त्यामुळे बॅंकांपुढील प्रश्‍न बिकट होऊ लागला आहे.
आणखी किती दिवस देखरेख?
यासंदर्भात माहिती घेतली असता, बॅंक ऑफ इंडियाकडे नऊशे कोटी रुपये, बॅंक ऑफ महाराष्ट्रकडे दोन हजार कोटी, तर आयडीबीआयकडे चार हजार कोटी
रुपयांच्या चलनातून बाद झालेल्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा पडून आहेत. अन्य बॅंकांचीही अशीच स्थिती आहे. अशाप्रकारे सुमारे शहरातील
सर्व बॅंकांकडे जवळपास वीस ते पंचवीस हजार कोटींच्या बाद नोटा पडून आहेत. करन्सी चेस्टमध्ये जमा झालेल्या नोटा रिझर्व्ह बॅंकेच्या खात्यात जमा झालेल्या आहेत. त्यामुळे त्यांची मालकी पूर्णतः रिझर्व्ह बॅंकेकडे आहे. बॅंकांकडे फक्त त्या नोटांवर देखरेख ठेवण्याचे काम आहे. या नोटांची अशी आणखी किती दिवस देखरेख करावी लागणार आहे, असा सवाल बॅंकांकडून उपस्थित केला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com