नोटाबंदीनंतर 4,313 कोटींचा काळा पैसा उघड 

वृत्तसंस्था
शनिवार, 31 डिसेंबर 2016

प्राप्तिकर विभागाने कर चुकवेगिरी, बेहिशेबी मालमत्ता आणि भ्रष्टाचाराशी संबंधित 487 केसेस केंद्रीय अन्वेषण विभाग(सीबीआय) आणि सक्तवसुली संचलनालय यासारख्या यंत्रणांकडे सोपविल्या आहेत.

नवी दिल्ली - केंद्राने पाचशे व हजारांच्या नोटा बाद केल्यानंतर प्राप्तिकर विभागाने तब्बल 4,313 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता उघड केली आहे. यादरम्यान, 554.6 कोटी रुपयांची रोख व दागिनेदेखील जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.  

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 8 नोव्हेंबर रोजी देशांतर्गत आर्थिक चलनातून पाचशे व हजाराच्या नोटा बाद झाल्यानंतर प्राप्तिकर विभागाने देशभरात 1,061 ठिकाणी छापे, सर्वेक्षण आणि चौकशा केल्या. याप्रकरणी विविध कंपन्यांना 5058 नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत.

याशिवाय, प्राप्तिकर विभागाने नव्या नोटांच्या स्वरुपातील 106.89 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता पकडली. त्याचप्रमाणे, 91.99 कोटी रुपयांचे सोने आणि दागिनेदेखील जप्त करण्यात आले. 

प्राप्तिकर विभागाने कर चुकवेगिरी, बेहिशेबी मालमत्ता आणि भ्रष्टाचाराशी संबंधित 487 केसेस केंद्रीय अन्वेषण विभाग(सीबीआय) आणि सक्तवसुली संचलनालय यासारख्या यंत्रणांकडे सोपविल्या आहेत.

Web Title: Over Rs 4,313 cr black income detected in 1,061 raids: I-T