निर्यातीला प्रोत्साहन मिळण्याची शक्‍यता

सकाळ वृत्तसेवा
Friday, 6 September 2019

निर्यातीला चालना देण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारकडून लवकरच प्रोत्साहनपर पॅकेजची घोषणा होण्याची शक्‍यता आहे.

नवी दिल्ली: निर्यातीला चालना देण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारकडून लवकरच प्रोत्साहनपर पॅकेजची घोषणा होण्याची शक्‍यता आहे. निर्यात क्षेत्राच्या सद्यस्थितीबाबत अर्थ आणि वाणिज्य खात्यामध्ये अनेक बैठका झाल्या असून त्यानुसार मदत ठरवली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

विशेष आर्थिक क्षेत्रांसाठी कर सवलत योजनेला मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. त्याशिवाय जेम्स अँड ज्वेलरी उद्योगांकरिता रत्ने आणि मौल्यवान खड्यांवरील तसेच पॉलिश हिऱ्यांवरील आयात शुल्कात कपात केली जाण्याची शक्‍यता आहे. एक्‍स्पोर्ट क्रेडिट ग्यारंटी कॉर्पोरेशनअंतर्गत निर्यातदारांना विमा संरक्षण मर्यादा 60 टक्‍क्‍यांवरून 90 टक्‍क्‍यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेतला जाऊ शकतो, असा अंदाज सूत्रांनी व्यक्त केला आहे. ज्यामुळे बॅंकांना निर्यातदारांना जादा पतपुरवठा करण्याचा मार्ग मोकळा होईल. जुलैमध्ये एकूण निर्यातीत केवळ 2.25 टक्‍क्‍यांची वृद्धी नोंदवण्यात आली होती. एप्रिल ते जुलै या कालावधीत निर्यातीत 0.37 टक्के घट झाली आहे. जागतिक बाजारातून मागणी कमी झाल्याने निर्यात क्षेत्रासाठी अडचणीत आले आहे. निर्यात क्षेत्राला सावरण्यासाठी तातडीने सवलत देण्याची मागणी फेडरेशन ऑफ इंडियन एक्‍स्पोर्ट ऑर्गनायझेशनचे महासंचालक अजय सहाय यांनी केली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: package may declare for export by government