पतंजलीच्या दुकानांमध्ये लवकरच कॅशलेस व्यवहार

वृत्तसंस्था
शनिवार, 17 डिसेंबर 2016

केवळ पन्नास रुपयांपेक्षा कमी रकमेचे व्यवहार रोख पद्धतीने होतील. नोटाबंदीच्या निर्णयानंतर पतंजलीच्या सर्व दुकानांमध्ये गरीबांना उधारीवर वस्तू देण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयाला पाठिंबा देणाऱ्या योगगुरु रामदेव बाबांनी आता पतंजलीच्या दुकानांमधील व्यवहार 'कॅशलेस' करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरु केले आहेत. 

नाताळापुर्वी सर्व दुकानांमध्ये डिजिटल स्वरुपातील व्यवहार सुरळीत व्हावेत यासाठी रामदेव बाबांनी पाच बँकांशी संपर्क साधला आहे. याशिवाय, पतंजलीच्या दुकानांमध्ये पन्नास रुपयांपासून पुढचे व्यवहार डिजिटल पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. 

"केवळ पन्नास रुपयांपेक्षा कमी रकमेचे व्यवहार रोख पद्धतीने होतील. नोटाबंदीच्या निर्णयानंतर पतंजलीच्या सर्व दुकानांमध्ये गरीबांना उधारीवर वस्तू देण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या", अशी माहिती पतंजलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आचार्य बाळकृष्ण यांनी दिली. 

"रोख रक्कम नसल्यामुळे कोणत्याही व्यक्तीचे नुकसान होऊ नये हा त्यामागचा हेतू आहे", असेही ते म्हणाले. पतंजलीची देशभरात 5300 दुकाने आहेत. 

नोटाबंदी जाहीर झाल्यानंतर रामदेव बाबांनी लगेचच एसबीआय, अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि पंजाब नॅशनल बँकेची भेट घेतली आहे. नाताळपूर्वी पतंजलीच्या देशभरातील 5,300 दुकानांना सर्व बँकांशी जोडून डिजिटल व्यवहार सुरळीत करण्याचा त्यांचा हेतू आहे. काही बँकांच्या अधिकाऱ्यांनी गुप्ततेच्या अटीवर या बातमीला दुजोरा दिला आहे.

Web Title: Patanjali plans to introduce cashless payments soon