पेट्रोल-डिझेलमधील दरवाढ सुरूच

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

सौदीमधील ड्रोनहल्ल्यानंतर कच्च्या तेलाची बाजारपेठ अस्थिर बनली असून, त्याचे पडसाद इंधनदरावर उमटत आहेत. पेट्रोलमध्ये २५ पैसे आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर २६ पैशांची आज वाढ झाली. पाच जुलैनंतर ही एका दिवसातील सर्वाधिक दरवाढ ठरली आहे. दरम्यान, जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत ०.२६ टक्‍क्‍याची घसरण नोंदविण्यात आली.

मुंबई - सौदीमधील ड्रोनहल्ल्यानंतर कच्च्या तेलाची बाजारपेठ अस्थिर बनली असून, त्याचे पडसाद इंधनदरावर उमटत आहेत. पेट्रोलमध्ये २५ पैसे आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर २६ पैशांची आज वाढ झाली. पाच जुलैनंतर ही एका दिवसातील सर्वाधिक दरवाढ ठरली आहे. दरम्यान, जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत ०.२६ टक्‍क्‍याची घसरण नोंदविण्यात आली. कच्च्या तेलाचा भाव प्रतिबॅरल ६४.३८ डॉलरवर आहे. मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलिटरला ७८.१० रुपये आणि डिझेलला ६९.०४ रुपये आहे.

अर्थसंकल्पात इंधनावरील उत्पादन शुल्कात वाढ केल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत २ रुपये ५० पैशांची वाढ झाली होती. त्यानंतर आज इंधनदरात सर्वाधिक वाढ झाली. सौदीमधील ड्रोनहल्ल्यानंतर तेलपुरवठा निम्म्याने कमी झाल्याने कच्च्या तेलाच्या किमतींनी सोमवारी (ता. १६) २० टक्‍क्‍यांची उसळी घेतली होती. परिणामी, मंगळवारी (ता. १७) पेट्रोल आणि डिझेलमध्ये अनुक्रमे १४ पैसे आणि १६ पैशांची वाढ झाली होती. गेल्या दोन सत्रांत जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती स्थिर असल्याने देशांतर्गत इंधन दरवाढ थांबेल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.

प्रमुख शहरांमधील पेट्रोल-डिझेलचा भाव
              पेट्रोल     डिझेल 

मुंबई        ७८.१०    ६९.०४
दिल्ली       ७२.४२    ६५.८२  

दहा दिवसांत तेलाचे उत्पादन पूर्ववत 
ड्रोनहल्ल्यानंतर सौदी सरकारने तेलाचे उत्पादन काही काळ थांबविले होते. मात्र, आता पुन्हा उत्पादन पूर्ववत करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. तेलाची उत्पादन क्षमता दोनतृतीयांशपर्यंत वाढली असल्याचे सौदीचे राजा मोहम्मद बिन सलमान यांनी म्हटले आहे. येत्या १० दिवसांत तेल उत्पादनक्षमता पूर्वीप्रमाणे होईल, असा आशावाद सलमान यांनी व्यक्त केला आहे. अबाकीक प्रकल्पात सध्या २० लाख बॅरल तेलाचे उत्पादन घेतले जात आहे. 

सप्टेंबरअखेर अबाकीक प्रकल्पातून पूर्वीप्रमाणे ४९ लाख बॅरल तेलाचे उत्पादन सुरू होईल, असे सौदी अरामकोचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमीन नासिर यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Petrol Diesel Rate Increase